गोवा खबर : नारायणनगर, होंडा पंचायत येथे क्रीडा क्षेत्राला चालना देणाऱ्या अत्याधुनिक क्रिकेट व फुटबॉल मैदानाचे उद्घाटन करण्यात आले आहे. आमदार देविया राणे यांच्या हस्ते या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन पार पडले.
या क्रीडांगणात FIFA मान्यताप्राप्त सिंथेटिक टर्फ, आधुनिक क्लबहाऊस, ५०० प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था, तसेच सायंकाळीही खेळता यावे यासाठी फ्लडलाइट्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅकही विकसित करण्यात आला आहे.
आमदार देविया राणे यांनी सांगितले की, हे मैदान केवळ खेळाचे ठिकाण नसून, युवकांना प्रशिक्षण, स्पर्धा आणि प्रगतीसाठी एक सक्षम व्यासपीठ ठरणार आहे. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक खेळाडूंना आपल्या गावातच व्यावसायिक दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे भविष्यात स्थानिक पातळीवर विविध क्रीडा स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन होऊन समाजात एकात्मता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच वॉकिंग ट्रॅक व मोकळी जागा यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्य व तंदुरुस्तीला प्रोत्साहन मिळणार आहे.
हा प्रकल्प म्हणजे क्रीडा संस्कृतीला चालना देणे, युवकांची प्रतिभा विकसित करणे आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.