गोवा खबर:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे जागतिक दर्जाचे विचारवंत होते, असे प्रतिपादन मांद्रेचे आमदार जीत आर्लेकर यांनी केले. चोपडे सर्कल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या राज्यातील सर्वाधिक उंच पुतळ्याचे अनावरण करताना ते बोलत होते.
मांद्रेतील ‘उदगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विकास समिती’च्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार आर्लेकर म्हणाले की, चोपडे सर्कलच्या सुशोभीकरणासाठी मांद्रे उदगत संस्थेमार्फत खर्च केला जाईल आणि येथे एक भव्य स्वागत कमानही उभारली जाईल.
या परिसराच्या सुशोभीकरणामुळे पर्यटकांना इथल्या संस्कृतीचे दर्शन घडेल. याप्रसंगी जि. पं. सदस्य तारा हडफडककर, चोपडे सरपंच शिल्पा नाईक आणि विविध पंचायतींचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच मांद्रे मतदारसंघातील उर्वरित रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण येत्या काही दिवसांत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाहीही आमदारांनी यावेळी दिली. लवकरच येथे भगवान परशुरामांचा पुतळाही उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.