गोवा खबर : भारत दौऱ्यावर असलेले व्हिएतनामचे वांशिक आणि धार्मिक व्यवहार मंत्रालयाचे उपमंत्री वाय. थोंग यांनी आज शिष्टमंडळासह अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्र शेखर कुमार यांची भेट घेतली. या बैठकीत सामायिक बौद्ध वारसा आणि दोन्ही देशांच्या जनतेमधील मजबूत परस्परसंबंधांसह भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील दीर्घकालीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी भारत-व्हिएतनाम व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या 10 व्या वर्षाचे महत्त्व नमूद केले आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना, डॉ. कुमार यांनी अधोरेखित केले की, भारत व्हिएतनामसोबतच्या आपल्या ऐतिहासिकदृष्ट्या निकटच्या आणि विश्वासपूर्ण संबंधांना उच्च प्राधान्य देतो. दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक संबंध आणि जनतेमधील मजबूत संबंधांचा उल्लेख करत त्यांनी नमूद केले की सामायिक बौद्ध वारसा हा भारत आणि व्हिएतनामच्या समाजांना जोडणारा एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणून काम करत आहे.

2025 मध्ये सारनाथ येथील भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या सार्वजनिक प्रदर्शनादरम्यान व्हिएतनामच्या लोकांनी दाखवलेल्या श्रद्धेबद्दल डॉ.कुमार यांनी प्रशंसा केली.


भारत आणि व्हिएतनाम यांनी त्यांच्या व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या 10 व्या वर्षात पदार्पण केले असून, समकालीन द्विपक्षीय संबंधांमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे दोन्ही बाजूंनी नमूद केले. वारसा आणि सांस्कृतिक संबंधांची महत्वाची भूमिका लक्षात घेत हा महत्त्वाचा टप्पा योग्य रीतीने साजरा करण्याच्या महत्त्वावर दोन्ही बाजूंनी भर दिला. या संदर्भात दोन्ही देश वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर काम करत असल्याचेही नमूद करण्यात आले.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने मजबूत योजना, विचारपूर्वक धोरणआखणी आणि सातत्यपूर्ण जनसंपर्काच्या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या कल्याण आणि विकासाप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.