Connect with us

गोवा खबर

गोवा राज्यातील दक्षिण-पश्चिम रेल्वे मार्गावरील 30 किमी लांबीच्या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण

Published

on

Spread the love
  • केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती

गोवा खबर : गोवा राज्यातील दक्षिण-पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे संपर्क सुविधेत वाढ करण्यासाठी  होसपेटे-हुबळी-वास्को या दरम्यानच्या 321 किमी लांबीच्या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यापैकी या प्रकल्पातील 261 किमी लांबीच्या दुहेरीकरणाचे कार्य पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत 72 किमी लांबीचा मार्ग गोवा राज्यातील आहे, ज्यातील 30 किमी लांबीचा मार्ग पूर्ण झाला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. या संबंधीचा प्रश्न खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी विचारला होता.

गोव्यातील या प्रकल्पातील मार्गाच्या लांबीसाठी एकूण 149 हेक्टर भूमी अधिग्रहण क्षेत्र आहे. पैकी 13 हेक्टर खाजगी भूमी आणि 136 हेक्टर ही वन भूमी आहे.  एकूण खाजगी 13 हेक्टर पैकी 11 हेक्टर भूमी अधिग्रहीत करण्यात आली आहे. तर वन भूमीच्या अधिग्रहणाचे काम अद्याप पूर्ण होण्याचे बाकी आहे अशी माहिती मंत्र्यांनी दिली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोवा राज्यातून देशातील अन्य भागांमध्ये  माल आणि प्रवासी वाहतुक करणे सुलभ होण्याबरोबरच जलदगतीने होईल असे ते म्हणाले.

संबंधित राज्य अथवा जिल्हा प्राधिकरणाच्या माध्यमातून  रेल्वे भूमी अधिग्रहीत करते. त्यासाठीच्या जमिनीचा मोबदला  आणि त्याची निश्चिती हे संबंधित राज्य सरकारांच्या अधिकारात असते. भूमी अधिग्रहणासाठी द्यावा लागणारा मोबदला हा राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून भू-लाभ धारकांना दिल जातो.  ही प्रक्रिया रेल्वे अधिनियम 1989 च्या तरतुदींच्या अधीन राज्य सरकार सोबत समन्वयाने पूर्ण केली जाते असे ही वैष्णव यांनी सांगितले.