गोवा खबर : ‘सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट’च्या सहयोगाने ढवळी, फोंडा येथील शैलेश बेहेरे यांच्या निवासस्थानी एका बायोगॅस प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. घरातील ओला कचरा आणि वाया जाणारे शिजवलेले अन्न यांपासून स्वयंपाकाचा गॅस निर्माण करणारा, तसेच घरगुती ओल्या कचर्याचा वापर करून पर्यावरण रक्षण करणारा हा एक अभिनव उपक्रम आहे.
या वेळी आयोजित एका कार्यक्रमाचे कवळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर यांनी श्रीफळ वाढवून आणि मान्यवरांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने दीप प्रज्वलन करून प्रारंभ केला.
यावेळी कवळे पंचायतीचे माजी सरपंच राजेश कवळेकर, विद्यमान पंच सदस्या प्रिया डोहिफोडे, पंचसदस्य देवराज उपाध्ये, उद्योजक नारायण नाडकर्णी, निवृत्त कृषी संचालक श्रीकांत मोने, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त विभागप्रमुख कृष्णराज गुप्ता, सनातन संस्थेच्या वेदिका गर्गे, ‘रत्नग्रीन टेक्नो सर्व्हीसीस’ आस्थापनाचे ‘बायोगॅस प्लांट’ उत्पादक मनीष आपटे आणि परिसरातील नागरिक यांची उपस्थिती होती.
प्रारंभी ‘सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट’च्या वतीने प्रदूषण नियंत्रण प्रणाली क्षेत्रातील उद्योजक नारायण नाडकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात ट्रस्टचे ध्येय स्पष्ट केले. ‘समाजामध्ये पर्यावरणाविषयी जागृती करणे आणि ओल्या कचर्याचा वापर करून उर्जानिर्मिती करणे’, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले.

माजी सरपंच राजेश कवळेकर म्हणाले,‘‘सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट’चे हे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत गॅसच्या किमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर इंधन स्वयंपूर्णता ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमाला आपले सतत सहकार्य असेल.’’
निवृत्त कृषी संचालक श्रीकांत मोने म्हणाले,‘‘बायोगॅसमधून बाहेर पडणारे खत हे गांडूळ खत आणि ‘वर्मी कंपोस्ट’ यांच्या दर्जाचे असेल आणि ते शेती, बागायती यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असेल.’’
गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त विभागप्रमुख कृष्णराज गुप्ता यांनी आपल्या मार्गदर्शनात या उपक्रमाचे कौतुक केले. सनातन संस्थेच्या वेदिका गर्गे म्हणाल्या,‘‘अशा नाविन्यपूर्ण कल्पना सुचण्यासाठी मन स्थिर असणे आवश्यक आहे. नामस्मरणामुळे चित्त शुद्ध आणि स्थिर होते.’’
कार्यक्रमाच्या प्रारंभी रत्नागिरी येथील ‘रत्नग्रीन टेक्नो सर्व्हीसीस’ आस्थापनाचे ‘बायोगॅस प्लांट’ उत्पादक मनीष आपटे यांनी प्रकल्पाची रचना, त्याची कार्यक्षमता आणि देखभाल यांवर सविस्तर सादरीकरण केले. शैलेश बेहेरे यांनी आभार प्रदर्शन केले.