गोवा खबर : पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील २५ हून अधिक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले जाईल, अशी माहिती गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे (GSIDC) अध्यक्ष तथा आमदार मायकल लोबो यांनी दिली.
महामंडळाच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
लोबो म्हणाले की, दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी दूरदृष्टी ठेवून या महामंडळाची स्थापना केली होती. गेल्या सात वर्षांत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली रवींद्र भवन, गोमेकॉतील सुधारणा, तुये रुग्णालय यांसारखे अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. निर्धारित वेळेत कामे पूर्ण करून ती संबंधित खात्यांच्या स्वाधीन करणे हे आमचे लक्ष्य आहे. या कार्यक्रमाला जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.