Connect with us

गोवा खबर

समाजाला आजही शिवरायांच्या विचारांची गरज : आमदार राणे

Published

on

Spread the love
  • मोर्ले येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

गोवा खबर : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे महिलांना मानसन्मान दिला, तसाच सन्मान आजच्या काळातही आपण महिलांना दिला पाहिजे. त्यासाठी महाराजांचे विचार केवळ ऐकून चालणार नाही, तर ते आत्मसात करून पुढच्या पिढीपर्यंत नेले पाहिजेत, असे प्रतिपादन पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी येथे केले.

मोर्ले येथे शिवजयंतीच्या औचित्यावर आमदार डॉ. राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या सोहळ्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी जमली होती. यावेळी आमदार राणे म्हणाल्या की, आज समाजात लहान मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार ऐकू येतात. हे चित्र बदलण्यासाठी आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत. जर मुलांवर योग्य संस्कार झाले, तरच त्यांच्यात महाराजांसारखे उदात्त विचार रुजू शकतात.

या कार्यक्रमात जिल्हा पंचायत सदस्य नीलेश परवार, मोर्लेचे सरपंच अमित शिरोडकर, उपसरपंच रुचिता माईणकर यांच्यासह स्थानिक पंच आणि उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारावंश मंदिराजवळ उभारलेला हा पुतळा युवकांना शौर्य आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.