इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ ला सुरुवात; गोव्याचे स्टार्टअप्सच्या नवकल्पनांचे सादरीकरण
एआय केंद्रस्थानी; दिल्लीतील आंतरराष्ट्रीय समिटमध्ये गोव्याचा सहभाग
गोवा खबर: उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि भविष्यकालीन प्रशासनासाठीची आपली बांधिलकी अधिक बळकट करत, गोवा इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ठोस आणि धोरणात्मक उपस्थिती दर्शवत आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) आयोजित केलेले हे समिट भारत मंडपम, नवी दिल्ली येथे १६ ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान होत आहे. ग्लोबल साउथमधील पहिल्या मोठ्या जागतिक एआय समिटपैकी हे एक असून सर्वसमावेशक, जबाबदार आणि सक्षम एआय पर्यावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.
पीपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या या समिटकडे जागतिक स्तरावर लक्ष वेधले गेले असून जगभरातील राजकीय नेते, उद्योग क्षेत्रातील नेते, स्टार्टअप्स आणि विविध हितधारकांचा सहभाग यात आहे. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभाग (डीआयटीईएण्डसी), गोवा सरकार यांची उपस्थिती भारतातील वाढत्या एआय परिसंस्थेत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याला एआय-आधारित नवोन्मेष केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याच्या त्यांच्या धोरणात्मक प्रयत्नांचे प्रतीक आहे.
उद्घाटनाच्या दिवशी एआय स्वीकाराबाबत आयोजित ज्ञानविनिमय कार्यशाळेत स्टार्टअप अँड आयटी प्रमोशन सेल, डीआयटीईएण्डसीचे श्री. हेरंब काणेकर यांनी गोव्याच्या एआय उपक्रमांची माहिती दिली आणि नागरिकांना लाभदायी ठरणारे तसेच स्टार्टअप्सना जबाबदारीने नवकल्पना करण्यास सक्षम करणारे नैतिक आणि विस्तारक्षम एआय उपाय विकसित करण्यासाठी राज्याची बांधिलकी व्यक्त केली.
गोवा एआय मिशन २०२७ अंतर्गत राज्याने एआय फॉर गव्हर्नन्स अँड सोशल इम्पॅक्ट कार्यशाळा, एआय हॅकाथॉन आणि गोवा ऑनलाइन पोर्टलवरील नवीन एआय चॅटबॉट यांसारखे उपक्रम सुरू केले आहेत. या प्रयत्नांमधून एआय केवळ तांत्रिक प्रगती म्हणून नव्हे तर सार्वजनिक सेवा वितरण सुधारण्यासाठी, पारदर्शकता वाढवण्यासाठी, स्टार्टअप्सना सक्षम करण्यासाठी आणि शाश्वत आर्थिक विकास घडवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून वापरण्याचा गोव्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो.
समिटमधील प्रमुख उपक्रमांपैकी भारत मंडपम येथे आयोजित एआय इम्पॅक्ट एक्स्पो हे एक अनुभवात्मक प्रदर्शन असून यात आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, उद्योग आणि स्टार्टअप पॅव्हिलियन्सचा समावेश आहे. ७०,००० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळावर १० विभागांमध्ये पसरलेल्या या एक्स्पोमध्ये ८४० हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले असून त्याचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच दिवशी केले.
डीआयटीईएण्डसीच्या सहकार्याने गोव्याचे पाच नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स या एक्स्पोमध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये श्री. गौरिश दत्ता पांगम आणि श्री. शिवम कामत यांचे DivvyUp आणि Grow; श्री. सिद्धार्थ मांजरेकर आणि श्री. सर्वेश पाटकर यांचे Frover Labs Pvt. Ltd.; श्री. साई विठ्ठल राणे यांचे Neural Kissan; श्री. मेक्सन फर्नांडिस यांचे Kverty; आणि श्री. देवांश चौधरी यांचे Phosic India Pvt. Ltd. यांचा समावेश आहे. हे स्टार्टअप्स विविध क्षेत्रांतील एआय अनुप्रयोग सादर करत असून गोव्याच्या वाढत्या नवोन्मेष परिसंस्थेची विविधता दर्शवत आहेत.
समिटदरम्यान एक्स्पो प्रतिनिधी आणि भेट देणाऱ्यांसाठी खुला राहणार असून १९ आणि २० फेब्रुवारी रोजी समिटच्या अंतिम दोन दिवसांत लीडर्स प्लेनरी सत्रे, राउंडटेबल्स आणि पॅनल चर्चा आयोजित करण्यात येणार आहेत. यात एआय मानवतेसाठी कसे उपयुक्त ठरू शकते, सर्वसमावेशक विकासाला कसे चालना देऊ शकते आणि शाश्वत प्रगती कशी साधू शकते यावर चर्चा होईल.
धोरणात्मक सहकार्य, दूरदृष्टीपूर्ण धोरणे आणि वाढत्या स्टार्टअप परिसंस्थेच्या माध्यमातून गोवा स्वतःला जबाबदार आणि भविष्यकालीन एआय गंतव्यस्थान म्हणून स्थापित करत आहे. गोवा पॅव्हिलियन (स्टॉल क्रमांक ४F.२१) हॉल क्रमांक ४ मध्ये भेट देऊन गोव्याचे नवोन्मेषक एआयचा वापर करून अर्थपूर्ण, सर्वसमावेशक आणि शाश्वत परिणाम कसे साधत आहेत हे प्रत्यक्ष अनुभवण्याचे आवाहन राज्याने प्रतिनिधी, उद्योग नेते, गुंतवणूकदार आणि भेट देणाऱ्यांना केले आहे.