- २०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम नाही : मंत्री विश्वजित राणे
गोवा खबर : राज्यातील महत्त्वाचा नैसर्गिक जलस्रोत असलेल्या बॉंडवेल तलावाच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने ठोस भूमिका घेतली असून तलावाच्या काठापासून २०० मीटरच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या बांधकामास परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती आरोग्य व नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

बॉंडवेल तलाव व्यवस्थापन समिती, स्थानिक ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत मंत्री राणे यांनी नगरनियोजन खात्याला स्पष्ट निर्देश दिले आहेत. तलावाच्या परिसराजवळ सुरू असलेल्या किंवा प्रस्तावित बांधकामांमुळे पर्यावरणीय संतुलन बिघडू शकते, तसेच पाण्याच्या स्रोतावर गंभीर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री राणे म्हणाले की, बॉंडवेल तलाव हा केवळ स्थानिकांसाठी नव्हे तर संपूर्ण परिसरासाठी महत्त्वाचा जलसाठा आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि नैसर्गिक परिसंस्था जपण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. तलावाचा बफर झोन निश्चित करण्यात आला असून त्यात कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही.