गोवा खबर : ‘जुने गोवे येथील गोवेश्वर मंदिरात देशभरातील १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आल्याने आता गोव्यात येणाऱ्या भाविकांना एकाच ठिकाणी सर्व ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडणार आहे. या ऐतिहासिक पावलामुळे गोव्यातील आध्यात्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर गोवेश्वर महादेव मंदिरात आयोजित प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गोव्याचा इतिहास मंदिरांच्या पुनर्बांधणीशी जोडलेला आहे. पोर्तुगीज आणि मुघल आक्रमणांच्या काळात अनेक प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त झाली होती, परंतु गोमंतकीयांनी आपला धर्म आणि संस्कृती जपून ठेवली. आज त्या मंदिरांची पुनर्बांधणी केली जात आहे. गोवेश्वर मंदिर हे केवळ एक शिवमंदिर नसून, ते महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्यातील भाविकांसाठी श्रद्धेचे मोठे केंद्र ठरेल.
या सोहळ्यात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात गोव्यातील मंदिरांचा सविस्तर इतिहास असून, तो पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.
या सोहळ्याला राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मंत्री सुभाष फळदेसाई आणि देशभरातील संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.