गोवा खबर : मुरगाव बंदर परिसरात होणाऱ्या कोळसा हाताळणीमुळे वाढलेल्या प्रदूषणाने आता उग्र रूप धारण केले आहे. बुधवारी आमदार संकल्प आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी ‘अदानी’ कंपनीच्या कोळसा टर्मिनलवर धडक देत जोरदार निदर्शने केली. यावेळी आमोणकर यांनी प्रशासनाला आणि संबंधित कंपनीला ७२ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
प्रदूषण आणि त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे वास्को आणि सडा भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे १५०० नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन सोपवले. आमोणकर म्हणाले, “जर तीन दिवसांत प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर मुरगावकर स्वतः अदानी टर्मिनलमध्ये घुसून काम बंद पाडतील.”
माजी आमदार मिलिंद नाईक आणि स्थानिक नगरसेवकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याने हे प्रकरण आता अधिक तापण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.