Connect with us

गोवा खबर

आम आदमी पक्षाला सिद्धेश भगत यांचा ‘रामराम’

Published

on

Spread the love
  • पक्षाची ध्येयधोरणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

गोवा खबर : गोव्यातील आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धेश भगत यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ‘आप’ आता आपल्या मूळ विचारसरणीपासून दूर गेल्याची घणाघाती टीका त्यांनी एका पत्रकार परिषदेत केली.

भगत यांनी आपला राजीनामा पक्षाचे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजीनाम्याचे कारण देताना ते म्हणाले की, “मी १ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या आशेने पक्षात प्रवेश केला होता. मात्र, सध्या पक्षाची दिशा आणि धोरणे मूळ तत्त्वांशी सुसंगत राहिलेली नाहीत. स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जेव्हा गोवा दौऱ्यावर येतात, तेव्हा दिल्लीतील नेतेच पुढे-पुढे करतात, स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना साधी दखलही दिली जात नाही.”

पक्षाचे नेते संदेश तेलेकर यांनी फोनवरून चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण आता चर्चा करून काहीही फायदा नाही, असे भगत यांनी स्पष्ट केले. भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत त्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसून, आपल्या समर्थकांशी चर्चा करूनच पुढील पाऊल उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या शक्यतेवरही त्यांनी सध्या तरी ‘नाही’ असे म्हटलेले नाही.