गोवा खबर : राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने राज्यातील विविध शासकीय संस्था आणि पर्यटन क्षेत्रात कार्यरत सेवादाता संस्था यांच्याशी नियमित समन्वय ठेवून तसेच चोख नियोजन करून 18NotOut (जेडेन फॉरएव्हर फाउंडेशन) या संस्थेद्वारे आयोजित सर्वसमावेशक पर्यटन उपक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यास सहकार्य केले. 18NotOut ही बेगळुरूस्थित, पालकांद्वारे चालवली जाणारी, सेक्शन८ अंतर्गत नोंदणीकृत ना-नफा तत्वावर चालणारी संस्था सर्वसमावेशक अनुभवांद्वारे दिव्यांग मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना सक्षम करण्यासाठी कार्य करते.
दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणाबाबत आपल्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग म्हणून, 18NotOut या संस्थेने १९ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान गोवा राज्यामध्ये तीन दिवसीय सर्वसमावेशक सहलीचे आयोजन केले होते. यामध्ये १५-२० कुटुंबे (सुमारे ३०-४० पर्यटक) सहभागी झाले होते. यामधील काही पर्यटक लोकोमोटर आणि दृष्टिदोष असे दिव्यंगत्व असलेले होते, तर काही पर्यटक व्हीलचेअर वापरणारे होते. या भेटीचा उद्देश सर्व सहभागींसाठी सन्मान, सुरक्षितता आणि सुलभता सुनिश्चित करून सामाजिक समावेश, मनोरंजन आणि अनुभवात्मक शिक्षणाला चालना देणे हा होता.
या पर्यटक गटाची प्रवास आणि प्रवेशसुलभता याबाबतच्या गरजा लक्षात घेऊन, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने राज्य कदंब परिवहन महामंडळ लिमिटेड (KTCL)कडे प्रवेशसुलभ वाहतूकसुविधा उपलब्ध करण्याची विनंती केली. कंदब परिवहन महामंडळाने रॅम्प असलेल्या, लो-फ्लोर इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून तत्परतेने सहकार्य केले. या सुविधेमुळे या पर्यटक गटातील दिव्यांग मुले आणि त्यांच्या कुटुंबांसाठी संपूर्ण प्रवासात सुरक्षित, आरामदायक आणि अडथळामुक्त प्रवास करणे शक्य झाले आणि समावेशक पर्यटनाचा आनंद घेता आला.
या सर्वसमावेशक प्रवास कार्यक्रमामध्ये वास्को रेल्वे स्टेशन आणि मोपा विमानतळावरून पर्यटकांना पिक-अप करणे; चर्च, किल्ले आणि मंदिरे यासह शहरातील प्रमुख ठिकाणे आणि वारसा स्थळांचा दौरा, मनोरंजक आणि जल-आधारित उपक्रमांसह समुद्र किनाऱ्याची सफर, संग्रहालय भेट, सनसेट क्रूझ, फॉन्टेनहासमधून वारसा पदयात्रा आणि चोडण बेट सफर यांचा समावेश होता. चोडण बेटाकडे जाताना फेरीबोट प्रवासादरम्यान या पर्यटकांना फेरीबोटमध्ये सुलभपणे चढता यावे यासाठी विशेष मदतीची व्यवस्था करण्यात आली होती.
या उपक्रमासाठीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आणि पर्यटनाचा चांगला अनुभव सुनिश्चित करणे या उद्देशाने, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने दिव्यांग मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एका प्रायोगिक अनुभवात्मक पर्यटनभेट नियोजित केली होती. या भेटीदरम्यान सहभागी पर्यटकांनी स्कूबा डायव्हिंग, जेट स्काय राईड्स आणि इतर प्रवेशसुलभ किनारी पर्यटन उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. या उपक्रमामुळे सर्वसमावेशक पर्यटन पायाभूत सुविधा आणि समन्वित, सुलभ सेवांचे महत्त्व अधोरेखित झाले.
सहभागींच्या सुरक्षितता आणि आरोग्यसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, या प्रवासादरम्यान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जुने गोवे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वैद्यकीय पथकही उपलब्ध करण्यात आले होते.
या उपक्रमाबद्दल बोलताना, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावस्कर यांनी सांगितले की, “समावेशक पर्यटन म्हणजे केवळ सुलभता नव्हे, तर दिव्यांग व्यक्तींना इतरांप्रमाणेच आनंद, प्रवास आणि मनोरंजनाचा अनुभव घेण्यासाठी सन्मान, सहभाग आणि समान संधी मिळवून देणे ही बाब महत्वाची आहे. विचारपूर्वक केलेले नियोजन, सुलभ पायाभूत सुविधा आणि आंतरविभागीय समन्वय यामुळे खरोखरच समावेशक, सुखद अनुभव निर्माण करता येतात हा विश्वास या उपक्रमातून सादर झाला आहे. सुलभ पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि राज्यातील सार्वजनिक सेवा व पर्यटन स्थळे सर्वांसाठी स्वागतार्ह असतील, प्रवेशसुलभ राहतील, याची खात्री करण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध आहे.”
हा उपक्रम दिव्यांगजन अधिकार कायदा, २०१६मधील उद्दिष्टे आणि भावना यांच्याशी सुसंगत असा हा पर्यटन उपक्रम आहे. सुलभ पर्यटन, समावेशक सार्वजनिक स्थळे आणि सामाजिक व मनोरंजक उपक्रमांमध्ये दिव्यांग व्यक्तींचा समान सहभाग निश्चित करणे या बाबींना चालना देण्याचे धोरण अवलंबलेल्या गोवा सरकारच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतिबिंबही या उपक्रमातून उमटले आहे.
राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या वतीने या उपक्रमाच्या यशस्वितेमध्ये सहकार्य व तत्पर सेवा उपलब्ध केल्याबद्दल कदंब परिवहन महामंडळ लिमिटेड आणि इतर भागधारकांचे जाहीर आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच गोवा राज्य हे सर्वांसाठी समावेशक व स्वागतार्ह असे ठिकाण राहील याची खात्री करण्यासाठी सामाजिक संस्था-संघटनांसोबत काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार यानिमित्ताने राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे