गोवा खबर : मांद्रे मतदारसंघातील आणि उत्तर गोव्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुये येथील नवीन हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले असून, येत्या ३० जानेवारीपासून हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार आहे, अशी अधिकृत घोषणा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत केली.
आमदार जीत आरोलकर यांनी ‘शून्य तासाच्या’ कामकाजादरम्यान हा प्रश्न उपस्थित केला होता. स्थानिक नागरिक या रुग्णालयाच्या प्रतीक्षेत असून त्यासाठी आंदोलनेही होत असल्याचे आरोलकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, रुग्णालयाची इमारत, आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री, साधनसुविधा आणि कर्मचारी वर्ग यांची नियुक्ती पूर्ण झाली आहे. ३० जानेवारीपासून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यामुळे पेडणे आणि मांद्रे भागातील आरोग्य सेवेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.