Connect with us

गोवा खबर

चिंबलचा युनिटी मॉल स्वदेशी, अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा रोजगाराभिमुख प्रकल्प : खंवटे

Published

on

Spread the love
  • ओलित क्षेत्राच्या संवर्धनासाठी सरकार कटीबध्द सर्व परवाने मिळवून व नियम पाळून प्रकल्प
  • उपोषणकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले चर्चेचे निमंत्रण

गोवा खबर : चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्प हा अधिसूचित ओलित संवर्धन क्षेत्रात समाविष्ट नाही आणि ओलित संवर्धन क्षेत्रात या प्रकल्पाचे कोणतेही विकासकाम होणार नसल्याचे स्पष्ट आश्वासन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज राज्य विधानसभेत दिले.

सांताक्रुझचे आमदार रूडॉल्फ फेर्नांडीस यांनी एका लक्षवेधी सूचनेव्दारे विधानसभेत युनिटी म़ॉलचा मुद्दा उपस्थित केला होता. ओलित संवर्धन प्राधिकरणाने देखील हा प्रस्तावित प्रकल्प अधिसूचित ओलित संवर्धन क्षेत्राच्या कार्यकक्षेबाहेर असल्याचे लेखी कळविले असल्याची माहिती देखील खंवटे यांनी पुढे दिली.

ओलित क्षेत्राच्या संवर्धनासाठी सरकार कटीबध्द असून पर्यावरणीय आणि आवश्यक ते सर्व नियम पाळले जातील असे आश्वासनही खंवटे यांनी दिले. हा प्रकल्प प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असला तरी, महामार्ग रूंदीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी प्रस्तावित मार्ग रूंदीकरण व घरांविषयी असलेल्या धोक्याबाबत उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले.

अनुसूचित जमातीच्या लोकांसहीत तेथील स्थानिकांनी उपस्थित केलेल्या व त्यांना ज्याची धास्ती आहे, अशा प्रश्नांवरही सरकार संवेदनशील असून प्रस्तावित प्रकल्प हा स्थानिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणारा असल्याचे खंवटे यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी जी पाण्याची गरज भासणार आहे, त्यासाठी तेथील तलाव किंवा अन्य कोणत्याही स्थानिक जलाशयाचे पाणी वापरले जाणार नाही. पाणी पुरवठा विभागाकडून प्रकल्पासाठी लागणारे पाण्याची गरज पूर्ण केली जाईल असे सुस्पष्ट आश्वासनही खंवटे यांनी दिले.

गोवा पर्यटन विकास महामंडळाने या प्रकल्पासाठी लागणारे सर्व परवाने आणि मंजुरी घेतल्याची ग्वाही खंवटे यांनी दिली. त्यात ओलित संवर्धन प्राधिकरणाने दिलेल्या परवान्यासह, गोवा राज्य प्रदूषण महामंडळाचा परवाना तसेच कायदा व नियमानुसार लागणारे अन्य सर्व परवाने मिळविण्यात आल्याची ग्वाही पर्यटनमंत्री खंवटे यांनी दिली.
२७ राज्यांनी ३८ एकता मॉलचे काम सुरू झाले आहेत. स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीची ही केंद्राची योजना असून इतर राज्ये प्रकल्पासाठी पुढे जात असताना, केवळ गोव्यात विरोध का, असा प्रश्न पर्यटनमंत्री खंवटे यांनी विरोधकांच्या चर्चेला उत्तर देताना केला.

प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतील हा प्रकल्प कारागिर व सेल्फ हेल्प ग्रुपना प्रेरणा देणारा असून स्थानिक संरचनेला बळकटी देणारा हा प्रकल्प असल्याचे खंवटे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज डिजीटल म्युझियम, पर्वरीतील टाऊन स्क्वेअर तसेच युनिटी मॉल हे केंद्राकडून ३ प्रकल्प राज्याला मिळाले. नवे प्रकल्प म्हणजे राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करणारे असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणारे हे प्रकल्प असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले.

या प्रस्तावित मॉलला विरोध करणारे लोक आता साखळी उपोषणास बसले आहेत. तथापि, या लोकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार केला आहे का, असा प्रश्नही खंवटे यांनी उपस्थित करताना ते म्हणाले की, सरकार रोजगार पुरवू शकत नसल्याचा आरोपही हेच लोक करतात असा आरोपही त्यांनी केला.

चिंबल येथील आयटी प्रकल्पालाही या लोकांनी विरोध केला. त्यावेळी सरकारनेही त्यांची बाजू ऐकली व प्रकल्प रद्द केला. कारण, त्या प्रकल्पात केवळ कुशल रोजगार पुरविण्याची क्षमता होती. मात्र आताचा युनिटी मॉल हा केवळ कुशल नव्हे तर अकुशल रोजगार पुरविणारा आहे, असे खंवटे यांनी स्पष्ट केले. चार मजली इमारतीचा हा प्रकल्प सुमारे २० हजार ८०० चौरस मीटर जागेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात केवळ ४ हजार चौरस मीटर जागेत प्रत्यक्ष बांधकाम असल्याचे ते म्हणाले.
युनिटी मॉल शेजारी इतर खाजगी वसाहत प्रकल्प आल्यावेळी आता सरकारच्या प्रकल्पांना विरोध करणार्यांना तेथे तोयार तलाव असल्याची जाणीव नव्हती का, असा खोचक सवालही खंवटे यांनी केला. प्रभाव क्षेत्र हे २५० मीटर असून हा प्रकल्प त्या निर्धारित मर्यादेबाहेर असल्याचेही स्पष्टीकरण खंवटे यांनी दिले.

प्रस्तावित मॉलपेक्षाही सरकारला मुलांच्या भवितव्याची अधिक चिंता असल्याची माहिती देताना, खंवटे यांनी सांगितले की, या सरकारला उपोषणकर्त्यांच्या मुलांच्याही भवितव्याची काळजी आहे. सांताक्रुझमधील अनेकांना हा प्रकल्प झालेला हवा आहे. ते मला सांगतात की आमच्या मुलांसाठी आम्हाला तो हवा आहे, उद्या ते लोकही रस्त्यावर येतील असे खंवटे म्हणाले. केंद्राचा हा प्रकल्प पर्यटन आणि सांताक्रुझच्या लोकांचा हिताचा असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत म्हणाले की, स्थानिकांशी आपण चर्चा केली असून आमदार रुडॉल्फ फेर्नांडीस त्या लोकांना घेऊन आले होते, असेही त्यांनी सांगितले.

उद्या संध्याकाळी विरोध करणार्या लोकांना चर्चेसाठी सभापतींनी निरोप पाठवून बोलवावे, सरकार त्यांच्याशी चर्चेला तयार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जैव विविधता समितीचा अध्यक्षांना या सर्व गोष्टींची माहिती असून तेच तेथे आता विरोध करत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ओलित क्षेत्राखाली येणारे सर्व तलाव संवर्धनासाठी आपल्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले असून अजूनही त्यासाठी सरकार कटीबध्द असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. चिंबल ग्राम सुधारण्याची गरज असून अधिकाधिक लाभ तेथील स्थानिकांना होणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली