-
खंवटेंचा विरोधकांना सज्जड इशारा : साळगांवकर यांच्या विजयाची खात्री
गोवा खबर : केंद्राच्या स्वदेश दर्शन योजनेखालील विकास प्रकल्पाची खोटी माहिती पसरवत, त्याचे राजकारण करून प्रस्तावित प्रकल्पास खो घालू पाहाणार्यांना, श्री देव म्हारींगण योग्य तो धडा शिकवेल असा इशारा पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिला आहे.
पेन्ह द फ्रांक जिल्हा पंचायत मतदारसंघाचे भाजप उमेदवार संदिप साळगांवकर यांच्या सालय येथील कोपरा सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी उमेदवार साळगांवकर, भाजपच्या एसटी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष दत्ताराम रेडकर व अन्य पंचसदस्य यावेळी हजर होते.
स्वदेश दर्शनचा अपप्रचार करणारे हे असंतुष्ट आणि विघ्नसंतोषी लोक, समाजाचे नाही तर, केवळ स्वतःचे हीत पाहात आहेत, असा आरोप खंवटे यांनी केला. स्वदेश दर्शन खाली पर्यटन खात्यातर्फे जे सादरीकरण होईल, तसेच व लोकांना जे हवे आहे तेच होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
ज्या लोकांना समाजात काही किंमत नाही, ते निवडणुका आल्यावर डोकी वर काढतात असे सांगून कॉंग्रेसशी हात मिळवणी करण्यासाठी यांना आपल्या समाजाचा उमेदवार मागे घ्यावा लागला, यावरून यांचे समाजातील स्थान काय ते लक्षात येते अशी मल्लीनाथीही खंवटे यांनी केली.
भाजपा सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. आम्हाला जातीभेद माहीत नाहीत. आम्ही जाणतो ती माणुसकी….! आणि तो एकच धर्म मानून आमची प्रगतीची कामे सुरू आहेत. पर्वरीचा झालेला कायापालट तुम्ही सारे याची देही याची डोळा… पाहाता आहात, असे खंवटे म्हणाले.
प्रस्तावित विकास प्रकल्पांचे राजकारण करणे बंद करा, असा सल्ला या विघ्नसंतोषी लोकांना खंवटे यांनी दिला. हे लोक स्वतः काही करत नाहीत, आणि इतरांना करू देत नाहीत असा आरोपही त्यांनी केला. आजवर पर्वरीकरांच्या रस्ते, वीज, पाणी विषयी समस्या सोडविण्यासाठी आमची पथके राबली, ती तशीच यापुढेही कायम राबतील, असे सांगून आम्ही संघटीतपणे मार्गक्रमण करतो, म्हणूनच जनता जनादर्नाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याचे खंवटे म्हणाले.
अंत्योदय घटकापर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजना पोचविण्याचे काम आमचे सुरू असून त्यात कधीच खंड पडणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले. पर्वरीच्य़ा प्रगतीसाठी आम्ही सारे एकसंघपणे कार्य करूया असे आवाहन करत त्यासाठी साळगांवकर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.