Connect with us

गोवा खबर

गणेश विसर्जनासाठी राज्यभर ४७ ठिकाणी दृष्टीचे मरीनचे जीवरक्षक तैनात

Published

on

Spread the love
  • मुख्य प्रवेशद्वारातूनच किनाऱ्यावर प्रवेश करण्याचे आवाहन; चिमुकल्यांची घ्यावी विशेष काळजी

गोवा खबर : संपूर्ण गोव्यात गणेश चतुर्थीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर विसर्जन सोहळे सुरक्षितपणे पार पडावेत आणि कोणतीही दुर्घटना टळावी यासाठी दृष्टी मरीन जीवरक्षक दलाने राज्यभरातील ४७ ठिकाणी जीवरक्षक तैनात केले आहेत. हे प्रशिक्षित जीवरक्षक विसर्जनावेळी मदत करणार असून, जलक्रीडा अपघात आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये तातडीने बचावकार्य करण्याची जबाबदारी सांभाळतील.

या ४७ विसर्जन स्थळांपैकी ३५ समुद्रकिनारे आणि १२ अंतर्गत ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणी २८ व ३१ ऑगस्ट तसेच २, ४, ६ आणि १७ सप्टेंबर (२१व्या दिवशीचे विसर्जन) रोजी जीवरक्षक तैनात राहतील. विसर्जन सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी हे जीवरक्षक रात्री उशिरापर्यंत कार्यरत राहतील.

समुद्रातील प्रबळ प्रवाह असलेल्या ठरावीक विसर्जन स्थळांवर भक्तांना मदत करण्याची जबाबदारी जीवरक्षकांवर सोपवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी सार्वजनिकरित्या पाण्यात उतरणे धोकादायक ठरू शकते, तेथे हे जीवरक्षक समूहांना सुरक्षितपणे मूर्ती पाण्यात नेऊन विसर्जन करण्यास सहाय्य करतील.

विसर्जन स्थळांवर आमचे जीवरक्षक भक्तांना मदत करून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करतील. समुद्र खवळलेला असल्यास विधी पूर्ण झाल्यानंतर आमचे जीवरक्षकच मूर्ती खोल पाण्यात घेऊन जातील, असे दृष्टी मरीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन आवस्थी यांनी सांगितले.

सर्व गणेशभक्तांनी समुद्रकिनाऱ्यावर केवळ मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश करावा, अशी विनंती आहे. तसेच विसर्जनाच्या या महासोहळ्यात पाण्याजवळ असताना प्रत्येक कुटुंबाने आपल्या चिमुकल्यांची विशेष काळजी घ्यावी.

जीवरक्षक तैनात असलेले समुद्रकिनारे

उत्तर गोवा :  कलंगुट, कांदोळी, वागातोर, हार्मल, मांद्रे, केरी, अश्वे, मर्जी, बागा, शिकेरी, हणजूण, मिरामर आणि सिरिडाओ समुद्रकिनारे.

दक्षिण गोवा : बायणा, बोगमलो, हॉलांत, माजोर्डा, उतोर्डा, बेतालबाटी, बाणावली, गाल्जीबाग, तळपण, वर्का, झालोर, केळशी, मोबोर, अगोंडा, पाळोळे,  पटनेम, राजबाग आणि पोळे समुद्रकिनारे.

३५ समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त, म्हापसा तार, पर्रा-वेरळा तलाव, हळदोणे तलाव, पणजी फेरी पॉईंट, वड्डेम तलाव, मोरजी तलाव, कुंभारजुवे फेरी पॉईंट, बेती फेरी पॉईंट,  बायणा खारेवाडा, बाणावली ग्रामपंचायती, सार्वजनिक संस्थानं आणि नगरपालिका यांच्या विनंतीनुसार प्रत्येक ठिकाणी दोन ते सहा जीव रक्षक नेमले जाणार आहेत.