गोवा खबर : फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
वास्कोचे आमदार आणि भाजप प्रवक्ते दाजी साळकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले, एक राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांबद्दल बोलताना प्रत्येकाने जबाबदारीने आणि विचारपूर्वक बोलले पाहिजे.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार आणि भाजपचे सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर, सर्वानंद भगत व जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उस्कईकर हे उपस्थित होते. साळकर म्हणाले, दामू नाईक हे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असून राज्यातील सर्व ४० मतदारसंघांमध्ये पक्षबांधणीचे प्रभावी काम करत आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर अशा प्रकारे टीका करणे चुकीचे आहे.

साळकर यांनी स्पष्ट केले की, सरदेसाईंची टीका केवळ फातोर्ड्यातील नुकत्याच पार पडलेल्या भाजप मेळाव्यात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे झालेली असू शकते. त्यांचा पराभव निवडणुकीत झाला असला तरी मताधिक्य वाढले होते, हे विसरू नये, असेही त्यांनी सांगितले.
गावडेंच्या विधानावर पक्षात चर्चा
खांडोळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप आमदार गोविंद गावडे यांनी पक्षविरोधी विधान केले. यावर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ कुंकळ्येकर म्हणाले, पक्षाच्या नेत्यांविषयी सार्वजनिकरित्या बोलणे हे अनुचित आहे. गावडेंच्या विधानांचा आढावा घेऊन प्रदेशाध्यक्ष लवकरच योग्य निर्णय घेतील. यापूर्वीही त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे.