Connect with us

गोवा खबर

‘नृत्य ब्रह्मांड’ला रसिकांची भरभरून दाद

Published

on

Spread the love

गोवा खबर : सिद्धकला नृत्य संस्थेच्या २३ व्या वार्षिक दिनानिमित रविवारी कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात झालेल्या नृत्य ब्रह्मांड या कार्यक्रमात भरतनाट्यम, चाणक्य तांडव, गणपती उत्सव, नवरात्री, दीपावली, कोळी नृत्य, लोकनृत्य, लावणी नृत्य, सामाजिक संदेश देणारे झाडे वाचवा नृत्य व शेवटी बॉलीवूड नृत्ये सिद्धकलाच्या विविध शाखांतील विद्यार्थीनींनी सुरेखरित्या सादर करून रसिकांची भरभरून दाद घेतली.

जवळ जवळ अडीचशे नृत्यांगनांचा समावेश असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना, नृत्य दिग्दर्शन (कोरिओग्राफी), सिद्धकलाच्या संचालिका तथा कुशल नृत्य गुरु जान्हवी बोंद्रे यांची होती. सादरीकरणात लालित्य, अभिनय कुशलता, भवाविष्कार याचा आविष्कार होता व गुरु जान्हवी यांनी त्यासाठी घेतलेली मेहनत जाणवत होती.

गणेश कौतुकम व शिव कीर्तनमने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. -या सोहळ्याला ख्यातनाम अभिनेत्री वर्षा ऊसगावकर यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती. त्यांच्या चित्रपटातील नृत्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी जान्हवी बोंद्रे व जयेश बोंद्रे यांनी सिद्धकलाच्या माध्यमातून नृत्य शिक्षणाची जी चळवळ चालवली आहे त्याचे कौतुक करून त्यांना दुवा दिला. त्या म्हणाल्या मी या कार्यक्रमातील मुलींची नृत्ये पाहून भारावून गेले. आपण प्रथमच तियात्रा त काम करत असून रसिकांनी ते आवर्जून पहावे असे आवाहन केले.

स्विटी वळवईकर, रुपम झोरे, प्रियांका हळदणकर, सिमरन हरमलकर, श्रद्धा उमर्ये, श्रुती शिरीन नाईक यांना यावेळी सन्मान प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. संस्थेचे मार्गदर्शक जयेश बोंद्रे, रुद्रा वायंगणकर, वंचिता म्हापसेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर अलिकडेच अरंगेत्रम सादर केलेल्या उर्वी, ध्रुवी व भूमी यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मिहिरा व ग्रीहा यांचे चाणक्य तांडव, उर्वी चे रामचंद्र सुब्रम, ध्रुवीची सत्यभामा, भूमीची द्रौपदी, साखळी, डिचोली, कांदोळी व म्हापसा शाखेतील मुलींनी सादर केलेल्या संतरचनांवरील नृत्यांची सुरेख अदाकारी व ईशानी देसाई या बालिकेने संत वेषात केलेले सुरेख निवेदन कार्यक्रमाची शोभा वाढविणारे होते.

लोबो म्हणाले, परदेशात पर्यटन स्थळांच्या ठिकाणी प्लॅटफॉर्म टाकून मनोरंजनासाठी संगीत, नृत्य असे कार्यक्रम सादर केले जातात असे कार्यक्रम गोव्यात पर्यटकांसाठी व्हायला हवेत व सिद्धकला सारख्या संस्थेला ती संधी मिळायला हवी. मी मुख्यमंत्र्यांकडे याविषयी बोलणार आहे. सिद्धकलाने  नृत्य शिक्षणासाठी चालवलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले

असेच गणपती उत्सव, नवरात्री, दीपावली यावरील नृत्य आविष्कार आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सण उत्सवांचे दर्शन घडवून गेले. त्याचे निवेदन अनुक्रमे डॉ. अनुराधा घाणेकर, डॉ. शमा शिरोडकर व डॉ. राजश्री विश्वनाथ मराठे यांनी केले. निमंत्रित प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार रोहित माने यांचेही यावेळी नृत्य झाले.

जान्हवी बोंद्रे यांनी स्वागतपर भाषण केले. पणजी आकाशवाणीवर निवेदिका म्हणून लौकिक मिळवलेल्या चारुशीला देसाई यांनी जवळ जवळ पाच तास चाललेल्या कार्यक्रमाचे निवेदन केले.