गोवा खबर : पर्यटन खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाने सुकुर पंचायत सभागृहात, ११वा आंतरराष्ट्रीय योग दिन भव्य आणि उत्साही पद्धतीने आयोजित केला होता. यावेळी १५० हून अधिक सहभागी वेलनेस, जागरूकता आणि सामुदायिक शांतीसाठी एकत्र आले होते. या कार्यक्रमात राज्याच्या पर्यटन कथेत योग आणि समग्र आरोग्य, एकत्रित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब दिसून आले.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत हा दिन साजरा करण्यात आला. त्यांनी समग्र आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोव्याला वेलनेसचे ठिकाण म्हणून स्थान देण्यात, योगाचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यटन संचालक केदार नाईक, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, सुकुरच्या सरपंच सोनिया पेडणेकर, पेन्हा दे फ्रांकचे सरपंच स्वप्नील चोडणकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता गुप्तेश नाईक, सुकुर पंचायत सदस्य आणि पर्यटन खाते व जीटीडीसीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक (मार्केटिंग) दीपक नार्वेकर यांनी उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन केली.
खंवटे म्हणाले, योग हा गोव्याच्या पुनरुत्पादीत पर्यटनच्या मुख्य मूल्यांशी सुसंगत आहे. संतुलन पुनर्संचयित करणे आणि समुदायांना सक्षम करणे, याचा त्यात समावेश आहे. अशा उपक्रमांद्वारे, आम्ही केवळ भारताच्या समृद्ध वारशाचा उत्सव साजरा करत नाही तर स्थानिक व पर्यटकांना देखील गोव्याच्या शांत नैसर्गिक परिसरात समग्र जीवन जगण्यास प्रोत्साहित करत आहोत.

केदार नाईक म्हणाले, योग दिन आपल्याला ही आठवण करून देतो, की वेलनेस आणि पर्यटन क्षेत्र हे हातात हात घालून पुढे जाऊ शकतात. जागरूक, पुनरुज्जीवित अनुभव देण्यासाठी गोवा सज्ज आहे. आम्ही स्थानिक संस्कृती, वेलनेस आणि शाश्वततेवर आधारित पर्यटनाला समर्थन देणारे मार्ग तयार करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत.
या कार्यक्रमात आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेले योग प्रशिक्षक आणि मूल्यांकनकर्ता तुळशीदास मंगेशकर आणि प्रमाणित योग शिक्षिका पूजा तुलशीदास मंगेशकर यांनी मार्गदर्शनात्मक योग सत्र घेतले, ज्यामध्ये विविध वयोगटातील आणि समुदायातील लोक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, उपस्थितांना शारीरिक चैतन्य, मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन वाढविण्यासाठी योगाचा दैनंदिन सराव करण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
व्यापक दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून विचार केला असता, गोवा सक्रियपणे वेलनेस आणि आध्यात्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देत आहे. आपले राज्य लोक आणि ग्रह दोघांचेही पोषण करणारे संथ, अधिक जाणीवपूर्वक अशा प्रवासावर भर देत आहे. योग दिन सारखे उपक्रम साजरा करण्यामागे, भारतातील प्रमुख वेलनेस स्थळ म्हणून पुढे येण्यासाठी गोव्याची आकांक्षा दिसून येते.
स्थानिक पंचायती आणि भागधारकांच्या सहकार्याने, पर्यटन खाते संपूर्ण गोव्यात निरोगी जीवनशैलीवर आधारित अनुभवांना प्रोत्साहन देत आहे. हे निरोगी समाज निर्माण करण्यासाठी आणि जागरूक, शाश्वत पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.