Connect with us

गोवा खबर

पर्वरीतील १०/१२वीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना गौरव सोहळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर :  गोवा शालांत मंडळाने मार्च-एप्रिल २०२५ मध्ये घेतलेल्या १०वी व १२वीच्या परिक्षेतील, पर्वरी मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयोजित सत्कार सोहळ्यास पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन पर्वरी रायझिंगने केले आहे. 

पर्वरी रायझिंग संस्था समाजाच्या भल्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करत असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा हा त्यापैकीच एक आहे. यश संपादन करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी या हेतूने दरवर्षी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते.

दहावी व बारावीच्या परिक्षेत ७५ टक्क्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात गौरव केला जातो. किर्तीवंत विद्यार्थ्यांचा गौरव करतानाच इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात येतो. पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी या उपक्रमाची संकल्पना घोषित केली होती.

सुकूर, साल्वादोर द मुंद व पेन्ह द फांक पंचायत क्षेत्रातील १० वी व १२ वीत ७५ टक्क्याहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी या सत्कार सोहळ्यासाठी पात्र असून त्यांनी २० मे २०२५ पर्यंत त्यासाठी अर्ज करावेत. सोबत गुणपत्रिका आणि पर्वरी निवासी पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज ७८८७८०९७५० या व्हॉटस अप क्रमांकावर किंवा info@pywt.in (आयएनएफओ एट द रेट पीव्हायडब्ल्यूटी डॉट आयएन) या इमेलवर पाठवावेत असे पर्वरी रायझिंगतर्फे कळविण्यात आले आहे.