गोवा खबर : गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (डीआयटीई अँड सी) खात्याच्या स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलतर्फे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स, प्रिंटिंग आणि स्टेशनरी मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय आमदार तथा इन्फो टेक कॉर्पोरेशन गोवाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत, गोवा ओपन इनोव्हेशन चॅलेंज २०२५चे (जीओआयसी २०२५) उदघाटन करण्यात आले.
यावेळी डीआयटीई अँड सीचे संचालक कबीर शिरगावकर, डीआयटीई अँड सीचे संयुक्त संचालक मिलिंद साखरदांडे, आयटीई अँड सी मंत्र्यांचे ओएसडी नेव्हिल नोरोन्हा आणि गोवा सरकारच्या स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलचे सीईओ डी. एस. प्रशांत उपस्थित होते.
या उदघाटनामुळे पर्यटन, कचरा व्यवस्थापन, कृषी, नाबार्ड, लोकसेवा आयोग आणि उद्योग यासारख्या क्षेत्रातील प्रमुख आव्हानांसाठी, तंत्रज्ञान आधारित उपाय विकसित करण्यास स्टार्टअप्स, विद्यार्थी, सरकारी संस्था आणि उद्योग एकत्र आले होते.

खंवटे म्हणाले, स्वयंपूर्ण आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या गोव्यामागे नवोपक्रम ही प्रेरक शक्ती आहे. गोवा ओपन इनोव्हेशन चॅलेंज २०२५सह, आम्ही विकसित भारत आणि विकसित गोवा यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत अश्या तंत्रज्ञान संधींना, एकीकृत करणारी संस्कृती जोपासत आहोत. सरकार एक सुविधा देणारे म्हणून पाठिंबा देत आमची स्टार्टअप आणि आयटी धोरणे शैक्षणिक प्रगतीशी सुसंगत आहेत, याची खात्री करून घेत आहेत. तसेच तरुणांना जागतिक स्तरावर विचार करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी कौशल्यांनी सुसज्ज करत आहे. आमचे लक्ष स्केलेबल स्टार्टअप्स तयार करण्यावर आहे. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी निर्माण करणाऱ्यांमध्ये रूपांतरित करणे आणि गोव्याला शाश्वत व प्रभावी नवोपक्रमाचे केंद्र बनवणे, यावर आमचे लक्ष आहे.

शेट्ये म्हणाले, शिक्षण, उद्योजकता आणि रोजगाराला प्राधान्य देऊन, आम्ही असे भविष्य घडवत आहोत जिथे प्रगती मूर्त आणि सुलभ असेल. आमचे लक्ष अशा उपायांवर आहे, जे आपल्या दैनंदिन जीवनात अखंडपणे एकत्रित येऊन विकासाचा प्रत्येक नागरिकाला फायदा होतो, याची खात्री करतात.
या उदघाटन कार्यक्रमामध्ये स्टार्टअपना आवश्यक मार्गदर्शन देऊन सुसज्ज करण्यासाठी, तज्ञांच्या नेतृत्वाखालील दोन मास्टरक्लास झाल्या. मुंबई एंजल नेटवर्क्सचे माजी अध्यक्ष आणि द ग्रेट युनिकॉर्न हंटचे संस्थापक सचिन कर्णिक यांनी “तुमच्या निधी उभारणीच्या प्रवासाची तयारी” या विषयावर मास्टरक्लास घेतला. यात निधी उभारणीच्या मुख्य पैलूंचा समावेश होता, ज्यामध्ये निधी उभारणीतील तोटे आणि चढ-उतार, निधी उभारणीची वेळ, निधी उभारणीचा शब्दकळा समजून घेणे, वास्तविक परिस्थितींमधील मूल्यांकन, भागधारक करार समजून घेणे आणि मूल्यमापनाच्या विसंगतींसाठी वाटाघाटी साधने यांचा समावेश होता. तर कोका-कोला आणि कॅपिलरी टेक्नॉलॉजीजचा अनुभव असलेले वित्त अनुभवी, तसेच एक अग्रेसर गुंतवणूकदार, श्रीधर सुब्रमण्यन यांनी “प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्ससाठी अनुपालन सुलभ बनवणे” या विषयावर मार्गदर्शन केले, ज्यात त्यांनी स्टार्टअपसाठी अनुपालन प्रक्रिया सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित केले.
याव्यतिरिक्त, “बिल्डिंग स्केलेबल स्टार्टअप्स” या विषयावरील पॅनेल चर्चेचे सूत्रसंचालन लेखिका, गुंतवणूकदार, सल्लागार वर्षा अदुसुमिल्ली यांनी केले. या पॅनल सदस्यांमध्ये टर्टलमिंटचे सह- संस्थापक आनंद प्रभुदेसाई; अँथिल व्हेंचर्सचे संस्थापक आणि सीईओ प्रसाद वंगा; रेनेविक सोलरचे मुख्य व्यवहार अधिकारी इशान शर्मा; क्विडिच इनोव्हेशन लॅब्सचे सह-संस्थापक राहत कुलश्रेष्ठ; अध्यक्ष – मोल्बियो डायग्नोस्टिक्स इंटरनॅशनल सेल्स अँड मार्केटिंग सुमित मित्रा यांचा सहभाग होता.
पॅनेल चर्चेदरम्यान, पॅनेलच्या सदस्यांनी व्यवसाय आणि नवोपक्रमांसाठी एक भरभराटीचे केंद्र म्हणून गोव्याचे अद्वितीय फायदे अधोरेखित केले. त्यांनी यावर भर दिला, की गोवा राज्य संतुलित जीवनमान, किमान पदानुक्रमासह सहयोगी कार्य संस्कृती आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी प्रदान करते, ज्यामुळे हे एक पायाभूत सुविधा स्थापन करण्यासाठी आदर्श ठिकाण बनते. राज्यात एक सहाय्यक परिसंस्था, मजबूत पायाभूत सुविधा आणि समुदाय-चालित वातावरण आहे, जे व्यवसाय वाढ आणि नवोपक्रम दोन्हीला प्रोत्साहन देते. याव्यतिरिक्त, गोवा राज्य सरकारी तांत्रिक प्रकल्पांच्या पायलटिंगसाठी एक आशादायी संधी प्रदान करते. या चर्चेत हे अधोरेखित झाले की, हेतू आता ठोस कृतींमध्ये रूपांतरित होत आहेत, ज्यामुळे गोवा हे कंपन्यांना मोठे करण्यासाठी आणि नवीन उपक्रमांना अग्रेसर करण्यासाठी एक गतिमान स्थळ म्हणून स्थान मिळवत आहे.
गोवा सरकारच्या स्टार्टअप अँड आयटी प्रमोशन सेलचे (एसआयटीपीसी) सीईओ डी. एस. प्रशांत यांनी या उपक्रमासंदर्भात माहिती दिली आणि सहभागीनी ज्या समस्यांचे निराकरण केले, त्यांचा आढावा घेतला.
गोवा ओपन इनोव्हेशन चॅलेंज २०२५च्या लाँचद्वारे, नवोपक्रमांना चालना देणे, नवीन संधी निर्माण करणे आणि स्टार्टअप परिसंस्थेच्या वाढीस पाठिंबा देताना आघाडीचे तंत्रज्ञान केंद्र म्हणून गोव्याचे स्थान मजबूत करणे, हे खात्याचे उद्दिष्ट आहे.