पणजी : पणजी महानगरपालिकेच्या (मनपा) महापौरपदासाठी रोहित मोन्सेरात व उपमहापौरपदासाठी संजीव नाईक यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने या दोघांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज पणजी मनपाच्या विशेष बैठकीत करण्यात आली.
पणजी मनपाच्या सभागृहात आज सकाळी ११ वाजता झालेल्या विशेष बैठकीत मोन्सेरात व नाईक यांची महापौर व उपमहापौर पदांसाठी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. रोहित मोन्सेरात हे महापौरपदी सलग पाचव्यांदा, तर संजीव नाईक उपमहापौरपदी सलग चौथ्यादा विराजमान झाले आहेत. या पदांवर या दोघांनी समाधानकारक काम केल्याने अन्य नगरसेवकांनीसुद्धा त्यांनाच पाठिंबा दर्शवला आहे.

मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे मनपावर वर्चस्व असून, महापौर व उपमहापौरपदासाठी कुणाची निवड करावी, याचा निर्णय तेच घेतात. रोहित हे २०२१ सालापासून सलग महापौरपदावर विराजमान आहेत.
महापौर व उपमहापौरपदाचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असतो. २६ मार्च रोजी तो संपुष्टात येत आहे. त्यानुषंगाने या पदांसाठी निवडणुक झाली. यंदाही मोन्सेरात व नाईक वगळता अन्य कुणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने बैठकीत त्यांची नावे बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले..यावेळी महापौर मोन्सेरात यांनी मनपाच्या विविध समित्या आणि त्यांचे सदस्य जाहिर केले.