गोवा खबर : गुरुप्रती श्रद्धाभाव ठेवून विद्या आत्मसात करणारा शिष्य हा आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो. गुरुकडून मिळविलेले ज्ञान ही शिष्यासाठी यशाची गुरुकिल्लीच असते म्हणूनच गुरु सदैव स्मरणात राहावा यासाठी गुरूंच्या स्मृती संमेलनासारख्या उपक्रमातून जागवल्या पाहिजेत, असे उद्गार सम्राट क्लब इंटरनॅशनलचे अध्यक्ष ॲड. अवधूत नायक सलत्री यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने काढले.
पणजी येथील नादब्रह्म संस्थेच्या ४३व्या पं. रत्नकांतबुवा रामनाथकर स्मृती संगीत संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पणजी येथील मिनेझेस ब्रागांझा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर विशेष निमंत्रित म्हणून मिनेझेस ब्रागांझा संस्थेचे सदस्य सचिव अशोक परब, रामनाथकरबुवांचे सत्शिष्य पं. धर्मानंद गोलतकर, पं. कमलाकर नाईक तसेच आयोजन संस्थेचे अध्यक्ष गजानन गोलतकर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या संगीत संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्व. रामनाथकर बुवांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी बोलताना अशोक परब म्हणाले की गोव्यात आग्रा घराण्याच्या कंठ गायकीला आकार देण्याचे महत्कार्य बुवांनी केले. आजची संगीत क्षेत्रातील पिढी ही शास्त्रीय संगीताच्या साधनेपेक्षा सुगम संगीताचे कार्यक्रम सादर करण्याला विशेष प्राधान्य देते, ही गोष्ट शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने योग्य नाही. संगीत शिकणाऱ्या तरुण कलाकारांनी या विषयावर आत्ताच चिंतन आणि मनन करावे असा सल्ला त्यांनी दिला. गोव्यात हजारोच्या संख्येने शास्त्रीय संगीत शिकणारे विद्यार्थी आहेत मात्र संमेलनाच्या ठिकाणी त्यांची उपस्थिती असत नाही याबद्दल परब यांनी नाराजी व्यक्त केली.
पं. कमलाकर नाईक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पं. रत्नकांतबुवा रामनाथकर गुरुजींच्या आठवणी सांगितल्या. गुरुकृपेमुळेच आपण घडल्याचे ते म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष गजानन गोलतकर यांनी स्वागत केले. दुर्गाकुमार नावती यांनी सूत्रनिवेदन केले. पं. धर्मानंद गोलतकर यांनी आभार मानले.
उद्घाटन सत्रानंतर अमेय वाडीकर तसेच दीपेश मिस्त्री यांचे शास्त्रीय गायन झाले. प्रा अमर मोपकर यांचे तबला स्वतंत्र वादन तर समारोपाच्या सत्रात बुवांचे सत्षिष्य पं. कमलाकर नाईक यांचे गायन झाले. या कलाकारांना तबल्यावर नितीन कोरगावकर आणि अमर मोपकर यांनी साथसंगत केली तर संवादिनीवर प्रसाद गावस व दत्तराज म्हाळशी यांनी साथ संगत केली. संगीत क्षेत्रातील जाणकारांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.