Connect with us

गोवा खबर

पणजीत ‘एका पेक्षा एक अप्सरा’ने रसिक मंत्रमुग्ध

Published

on

Spread the love

गोवा खबर : पणजी शिगमोत्सव समितीतर्फे आझाद मैदानावर रविवारी लक्ष्मी प्रॉडक्शन पुणे निर्मित ‘एका पेक्षा एक अप्सरा’ या लावणीच्या कार्यक्रमात रसिक रंगून गेले. विविधरंगी लावण्यांनी आझाद मैदान परिसर दुमदुमून गेला होता.

नृत्य चंद्रिका भाग्यश्री नगरकर, आयटम गर्ल संगीता जाधव, लावण्यसुंदरी स्नेहल सातारकर, वन्समोर क्वीन लंका जावळे, नृत्यबिजली सुनीता कराडकर यांनी लावण्य नृत्याविष्काराने उत्तरोत्तर दाद घेतली.

गण गवळणीने सुरू झालेल्या या कार्यक्रमात भाग्यश्री यांनी यावं यावं.., पाडाला पिकला आंबा.., खेळताना रंग होळीचा.. अशा लावण्या ठसक्यात सादर करून उस्फूर्त दाद मिळवली. लंका जावळे यांनी ड्रायव्हरला जीव लाव, दिलबरा माझी.., संगीता जाधव यांनी नाद खुळा, खाजवा की, स्नेहल यांनी कारभारी दमानं.., सुनीता यांनी नाकी डोळी छान अशा लावण्यानी माहोल निर्माण केला.

पणजी शिगमोत्सव समितीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदा ज्येष्ठ कलाकार रंगकर्मी संतोष गावकर, महादेव नाईक व तियात्रिस आलवितो फर्नांडिस व महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत रुद्रेश्वरचे मिडिया नाटक प्रथम आल्याबद्दल त्याचे दिग्दर्शक सतीश नार्वेकर या कलाकारांचा प्रमुख पाहुण्या लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या सई बिजलानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर, अल्कॉन व राजदीप बिल्डर्स, काकुलो मॉल यांचा प्रातिनिधिक सन्मान केला. सई बिजलानी यांनी अशा सांस्कृतिक उत्सवांना लोकमान्य नेहमीच पाठिंबा देत आली आहे, असे सांगून शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक उपस्थित होते. प्रा. शशिकांत सरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.