Connect with us

गोवा खबर

गोव्यात ७५ सक्रिय मोफत सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉटचा शुभारंभ : समुदाय जोडणी, डिजिटल विकासाला प्रारंभ

Published

on

Spread the love

गोवा खबर :  डिजीटल फूट दूर करण्यासाठी समुदायाना सशक्त बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खात्याने राज्यभर ७५ सक्रिय विनामूल्य सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट सुरू केले आहेत. डिजिटल सुलभता वाढवणे, ग्रामीण भाग आणि सार्वजनिक ठिकाणांना जोडणे तसेच तंत्रज्ञानावर आधारित राज्य बनण्याच्या गोव्याच्या दृष्टीकोनाला पाठिंबा देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

अखंड जोडणी सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करून, प्रत्येक विनामूल्य सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट हे ३० एमबीपीएस पर्यंत उच्च-गतीचे इंटरनेट प्रदान करेल. या सहयोगी प्रयत्नांचा एक भाग म्हणून, सर्व ४० आमदारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघातील ३ प्रमुख ठिकाणे ओळखण्यास सांगण्यात आले आहे, जेथे सार्वजनिक वायफायचा सर्वाधिक प्रभाव पडेल. हा उपक्रम २०+ गावातील पंचायतींना जोडणारा आहे. याचबरोबर आणखी ७५ हॉटस्पॉट दोन आठवड्यांनी लाइव्ह होणार आहेत.

डिजिटल जोडणीप्रती सरकारच्या वचनबद्धतेला पुढे नेत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरीत मंत्रालयातून, ७५ मोफत सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट्सचा शुभारंभ केला. त्यांनी सांगितले, की “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या ध्येयाच्या मार्गदर्शनाने, गोवा राज्य भविष्यात डिजिटल होण्यासाठी आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. हा धाडसी उपक्रम प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवण्यासाठी आणि नवीन संधी उपलब्ध करण्यास तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याबाबत आहे. मोफत सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट प्रकल्पाचा विद्यार्थ्यांना विशेष फायदा होईल.”

या प्रसंगी बोलताना माननीय पर्यटन आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स तथा प्रिंटिंग आणि स्टेशनरी मंत्री रोहन खंवटे म्हणाले, की “३० एमबीपीएसवर उच्च-गतीचे इंटरनेट प्रदान करणाऱ्या ७५ मोफत वायफाय हॉटस्पॉट्सचा शुभारंभ, हे संपूर्ण गोव्यात इंटरनेट प्रवेश सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सहयोगी प्रयत्नांद्वारे आम्ही गोव्यातील जनतेला दिलेले वचन पूर्ण करत आहोत आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करत आहोत. आत्मनिर्भर भारतचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून डिजिटलायझेशन आणि जोडणी, या वायफाय हॉटस्पॉट्सद्वारे सक्षम करण्यात आली आहे. ही जोडणी अंतर कमी करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

मोफत सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट विद्यार्थ्यांना, उद्योजकांना, पर्यटक आणि स्थानिक समुदायाना विश्वासार्ह इंटरनेट सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू केले आहेत. हे पाऊल केवळ डिजिटल साक्षरतेलाच समर्थन देत नाही तर संपूर्ण राज्यात स्मार्ट पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाचा पाया देखील घालते.

प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असलेल्या डिजिटल संसाधनांमध्ये त्यांना प्रवेश मिळावा यासाठी तसेच समुदायाला सक्षम बनवून, जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी गोवा सरकार वचनबद्ध आहे.