गोवा खबर : परशुराम गोमंतक सेनेच्या ’गोमंतक निवास निर्माण योजने’ अंतर्गत बांधलेल्या दुसर्या घराचे चोडण येथे सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर आणि सहकार्यांच्या उपस्थितीत हस्तांतरण करण्यात आले. यावेळी सेनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
चोडण येथील जॉनी फर्नांडिस आणि तेरेझा फर्नांडिस यांचे घर कोसळण्याच्या मार्गावर होते. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना त्याची दुरुस्ती करणे अशक्य झाले होते. याची दखल घेत परशुराम गोमंतक सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हे घर नव्याने बांधून दिले.
या घराच्या हस्तांतरणावेळी फर्नांडिस दाम्पत्य यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. या घरात सर्व अद्ययावत सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
राज्यातील गरीब, बेघर गोमंतकीयांना घरे बांधून देण्याचा संकल्प सेनेने सोडला आहे. परशुराम सेनेकडून करण्यात आलेल्या या मदतीमुळे सेनेच्या पदाधिकार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याआधीही सेनेकडून एका गरजवंतासाठी घराची उभारणी करण्यात आली आहे.