गोवा खबर : २६ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे कर्तव्य पथ येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर होणाऱ्या गोवा राज्याच्या चित्ररथ निर्मितीचे काम राष्ट्रीय रंगशाळा कॅम्प, नवी दिल्ली येथे जोरात सुरू आहे.
गोव्यातील फोंडा येथील कलाकार सुशांत खेडेकर यानी चित्ररथाची संकल्पना आणि रचना केली आहे आणि २६ डिसेंबर २०२४ पासून राष्ट्रीय रंगशाळा शिबिरात चित्ररथाच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे. खेडेकर आणि श्री पूर्णानंद पैदरकर यांच्या नेतृत्वाखाली ३० गोव्यातील शिल्पकार, कारागीर, फॅब्रिकेटर्स, सुतार आणि इतर लोकांची टीम २२ जानेवारी २०२५ पर्यंत चित्ररथ तयार करण्यासाठी समर्पित प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.

यावर्षी गोवा राज्य गोव्याच्या समृद्ध संस्कृती आणि प्रगतीचे चित्रण करणारा “स्वर्णिम भारत…विरासत आणि विकास” या संकल्पनेवर रंगीत चित्ररथ सादर करणार आहे. हा सर्व गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण असून गोव्याच्या समृद्ध संस्कृतीचे आणि प्रगतीचे चित्रण करणारा हा चित्ररथ २६ जानेवारी २०२५ रोजी दोन वर्षांच्या कालावधीनंतर कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिन संचलनात प्रदर्शित करण्यात येईल. दोन वर्षांच्या कालावधीनंतर कर्तव्य पथावर २६ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने राज्य आणि संघप्रदेशासह १५ चित्ररथांची तसेच १० मंत्रालये, विभागांच्या चित्ररथांची निवड केली आहे. ‘ स्वर्णिम भारत-विरासत आणि विकास’ म्हणजे ‘सुवर्ण भारत…वारसा आणि विकास’ अशी या वर्षाची संकल्पना आहे.
माहिती आणि प्रसिध्दी खात्याखाली प्रदर्शित होणारा गोवा चित्ररथ भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या तज्ञ समितीच्या बैठकीत निवडण्यात आला आहे. संकल्पना, डिझाईन आणि व्हिज्युअल घटकांच्या विविध पैलूंचा विचार करून तज्ञ समितीने गोवा चित्ररथास मान्यता दिली आहे.
या वर्षी या चित्ररथासाठी संगीत डॉ. साईश देशपांडे यांनी दिले आहे आणि दिनेश प्रियोळकर यांच्या नेतृत्वाखाली लाइव्ह डान्स सादर करण्यात येईल. नृत्यदिग्दर्शन निषाद यांनी केले आहे, तर वेशभूषा संगीता आणि अवनी खेडेकर यांनी केली आहे.
कर्तव्य पथावरील संचलनानंतर २६ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत भारत पर्व सोहळ्याचा एक भाग म्हणून इतर सहभागी राज्यांसह गोव्याचा चित्ररथ लाल किल्ल्यावर प्रदर्शित केला जाईल. या काळात संबंधित राज्यांतील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.