गोवा खबर : हैदराबाद येथील हायटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये ६ ते ८ डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजित इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टमध्ये (आयआयटीएम) गोवा पर्यटनाने प्रतिष्ठित बेस्ट रिस्पॉन्सिबल टुरिझम इनिशिएटिव्ह इन इंडिया (सर्वोत्कृष्ट जबाबदार पर्यटन उपक्रम) पुरस्कार जिंकला.
एन एस एन मोहन, प्रादेशिक संचालक – भारत, स्काल इंटरनॅशनल यांनी प्रदान केलेला हा पुरस्कार राजेंद्र तारी, माहिती सहाय्यक, पर्यटन खाते आणि हरीश साटलेकर, व्यवस्थापक मार्केटिंग, जीटीडीसी यांनी स्वीकारला. ही मान्यता गोव्याच्या शाश्वत आणि जबाबदार पर्यटन पद्धतींबद्दलची अतुलनीय बांधिलकी अधोरेखित करते आणि पुनरुत्पादक पर्यटनातील अग्रणी म्हणून, राज्याचे स्थान आणखी मजबूत करते.
आयआयटीएम हैदराबाद येथील गोवा पर्यटन दालन हे क्रियाकलापांचे केंद्र बनले आहे. यात बी२बी परस्पर संवाद आणि गतिमान नेटवर्किंग सत्रांचे आयोजन करण्यात आले, ज्याने गोव्याला संस्कृती, वारसा आणि अविस्मरणीय अनुभवांचे अंतिम गंतव्यस्थान म्हणून प्रदर्शित केले आहे. उपस्थितांना दालनाचे दोलायमान प्रदर्शन, परस्पर संवादी सहभाग आणि अनन्य सेवांकडे आकर्षित करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमादरम्यान, गोवा पर्यटनाने आपला समृद्ध वारसा, उत्सव आणि रोमांचक प्रवास पॅकेजवर प्रकाश टाकला, ज्यामध्ये न पाहिलेली स्थळे, अंतर्गत आणि हरित-पर्यटन सर्किट्स सारख्या उपक्रमांवर भर देण्यात आला. अभ्यागतांना विशेष प्रवासी पॅकेजचा अनुभव घेण्याची आणि समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे जाऊन, पर्यटनाला चालना देण्यासाठी गोव्याच्या नाविन्यपूर्ण प्रगतीबद्दल जाणून घेण्याची संधीही देण्यात आली.
यावेळी बोलताना पर्यटन संचालक आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका, आयएएस, म्हणाले कि “सर्वोत्कृष्ट जबाबदार पर्यटन उपक्रम पुरस्कार प्राप्त होणे, हे शाश्वत आणि समुदाय-आधारित पर्यटनाप्रती आमच्या समर्पणाचा पुरावा आहे. आयआयटीएम हैदराबाद हे अद्वितीय, समृद्ध संस्कृती आणि जबाबदार प्रवास अनुभव देणारे गंतव्यस्थान म्हणून, गोव्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक अविश्वसनीय व्यासपीठ आहे.”
या दालनाने धोरणात्मक भागीदारी आणि अर्थपूर्ण चर्चेसाठी एक व्यासपीठ देखील प्रदान केले. ज्यामुळे गोव्याचे स्थान भारताच्या पर्यटन क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य गंतव्यस्थान म्हणून मजबूत झाले आहे.