गोवा खबर : सनातन संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा ३० नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सवी सन्मान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते केला जाणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद डॉ. जयंत आठवले यांच्या एक उत्तराधिकारी बिंदा सिंगबाळ यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात गोविंददेव गिरि महाराज यांचे होणारे मार्गदर्शन म्हणजे गोमंतकियांसाठी अमूल्य पर्वणीच आहे. या अमूल्य अशा क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी गोमंतकियांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला ‘गीता परिवार’चे महासचिव सुभाष नाईक आणि सनातन संस्थेच्या शुभा सावंत यांची उपस्थिती होती.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाविषयी माहिती देतांना राजहंस म्हणाले, ‘सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे आहेत. सनातन संस्थेची २५ वर्षे म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक सेवेची २५ वर्षे आहेत. अध्यात्मशास्त्रावरील सनातनची ग्रंथसंपदा आणि सनातन शिकवत असलेली ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ यांमुळे आज १२२ साधक संत झाले असून १ हजारांहून अधिक साधकांचा प्रवास संतत्वाच्या दिशेने होत आहे. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनामुळे हजारो लोक आज तणावमुक्त, व्यसनमुक्त आणि आनंदी जीवन जगत आहेत. रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेने समाजातील सर्व घटकांसाठी निशुल्क तणावमुक्त आणि व्यसनमुक्त जीवनासाठी कार्यशाळा आयोजित केल्या. अशा सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सव म्हणजे दुग्धशर्करायोगच आहे.’