गोवा खबर : माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभाग (डीआयटीईअँडसी) आणि पर्यटन खाते, गोवा सरकार यांच्या सहकार्याने लोकमतने प्रदान केलेले प्रतिष्ठित गोवा स्टार्ट-अप आणि पर्यटन पुरस्कार २०२४ कार्यक्रम पणजीतील फिदाल्गो हॉटेलमध्ये पार पडला.
गोव्यातील सर्वात आशाजनक स्टार्टअप्सच्या उल्लेखनीय कामगिरीचा उत्सव यावेळी साजरा करण्यात आला. पर्यटन आणि तंत्रज्ञान यासारख्या गोव्याच्या उद्योजकीय क्षेत्रामध्ये प्रगती करणाऱ्या स्टार्टअप्सच्या योगदानावर या कार्यक्रमाने प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स मंत्री रोहन खंवटे, आयटीजीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वोलवटकर, पर्यटन मंत्र्यांचे ओएसडी शॉन मेंडिस आणि स्टार्टअप व आयटी प्रमोशन सेलचे सीईओ डी. एस. प्रशांत यांची उपस्थिती लाभली.
खंवटे यांनी त्यांच्या प्रेरणादायी अंतर्दृष्टीने सांगितले, आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमे, समाज घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, आणि अर्थपूर्ण उपक्रमांना समर्थन देणारे मीडिया क्षेत्र तयार करण्याची गरज आम्हाला वाटते. गोव्यात, आयटी आणि पर्यटनासाठी आमचा दृष्टीकोन सखोल व सहयोगी आहे. शैक्षणिक, उद्योग आणि सरकार यांना संलग्न करण्यासाठी स्थानिक उद्योजकांना सक्षम बनवणारी आणि नवकल्पना वाढवणारी एक प्रगत विचारांची इकोसिस्टम पुढे नेण्याप्रती काम सुरू आहे. २२५ हून अधिक स्टार्टअप्स, स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल (एसपीसी), गोवा सोबत सक्रियपणे काम करत असून, गोव्यातील उद्योजकता फलदायी होत आहे. विकसित भारत २०४७ व्हिजनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण हे मुख्य स्तंभ आहेत. आम्ही सर्वसमावेशक आणि प्रगतीशील वातावरण तयार करण्यासाठी समर्पित आहोत, जिथे प्रत्येक गोमंतकीय आपल्या राज्याच्या विकासात योगदान देऊ शकेल आणि त्याचा लाभ घेऊ शकेल.
सर्जनशील, प्रभाव, प्रगतीची क्षमता आणि संघ शक्ती या निकषांवर आधारुन पुरस्कारांचे मूल्यमापन करण्यात आले. या श्रेणींमध्ये पर्यटन स्टार्टअप, सर्जनशील हरित पर्यटन, अंतर्गत पर्यटन, उदयोन्मुख स्टार्टअप, नाविन्यपूर्ण स्टार्टअप, महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप आणि प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट स्टार्टअप हे यंदाच्या पुरस्कारांचे विभाग होते. सर्वोत्कृष्ट पर्यटन स्टार्टअप म्हणून ‘वन बोर्ड’ यांना, अंतर्गत पर्यटनात सर्वोत्कृष्ट सर्जनशीलता ‘द लोकल बीट’ यांना, सर्जनशील हरित पर्यटनासाठी ‘मृगया एक्सपीडिएशन्स’ यांना, उदयोन्मुख स्टार्टअपसाठी ‘स्पेशियलक्राफ्ट’ आणि ‘ट्रॅश कंपनी’ यांना, ‘एसएमडीपॉवर सोल्युशन्स’ आणि ‘डायगोप्रेयुटिक प्रायव्हेट लिमिटेड’ यांना सर्जनशील स्टार्टअप पुरस्कार, तर ‘एसियर सोल्युशन्स’, ‘सेवरात’ आणि ‘मेक इट हॅपन’ यांना महिला-नेतृत्व स्टार्टअप्स, आणि ‘स्पिंटली’ यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट स्टार्टअप म्हणून गौरवण्यात आले.
खंवटे म्हणाले, आमचे आयटी धोरण गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एक स्पष्ट दिशा दर्शविते, तर आमचे स्टार्टअप धोरण २०२४ स्थानिक उद्योजकांना विकासासाठी आवश्यक समर्थन प्रदान करते. ही दोन्ही धोरणे गोव्याला स्टार्टअप्ससाठी एक महत्त्वाकांक्षी केंद्र म्हणून स्थापित करत आहे. महिला उद्योजक, विशेषत: इको-टुरिझम, होमस्टे आणि पुनरुत्पादक पर्यटनामध्ये, नाविन्यपूर्ण व्यवसायांद्वारे स्थानिक संस्कृतीचे जतन आणि संवर्धन कसे करता येईल, हे दाखवून देत आहेत. आमचा नारी शक्ती उपक्रम महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपला सक्षम बनवण्यासाठी समर्पित आहे आणि आमचे होमस्टे धोरण, महिलांना यशस्वी उपक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन प्रदान करते आहे. एकत्रितपणे, आम्ही गोव्याला नावीन्य, सर्जनशीलता आणि शाश्वत विकासासाठी एक भरभराटीचे केंद्र बनवून, आमच्या नागरिकांसाठी कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्याच्या दिशेने अधिक टप्पे गाठण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
ते पुढे म्हणाले, पुनरुत्पादक पर्यटनामध्ये चॅम्पियन असलेले गोवा हे भारतातील पहिले राज्य आहे. गोवा पर्यावरणाचा सन्मान करणारे, स्थानिक समुदायांना बळकटी देणारे आणि गोव्याच्या वारशाचे सार जतन करणारे, अश्या शाश्वत विकास क्रमवारींमध्ये अग्रेसर आहे.
गोवा स्टार्ट-अप आणि पर्यटन पुरस्कार २०२४ चा सर्व उद्योजक, स्टार्टअप आणि नवोदितांना अडथळे पार करत आणि सर्वसमावेशक व विकसित-विचार करणाऱ्या स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्याच्या आवाहनासह समारोप झाला. गोव्याच्या स्टार्टअप्सची यशोगाथा साजरी करून, या पुरस्कारांनी सर्वांना उत्कृष्टता आणि नावीन्य शोधण्यासाठी प्रेरणा दिली आहे, ज्यामुळे राज्याचा पर्यटन व तंत्रज्ञान या दोन्हीसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून, दर्जा अधिक मजबूत झाला आहे.
लोकमतने दिलेल्या विशेष पोचपावतीत लोकमत गोवाचे महाव्यवस्थापक संदीप गुप्ते, पर्यटन मंत्र्यांचे माध्यम सल्लागार, सागर अग्नि, प्राइम मीडिया गोवाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप केरकर आणि डीएनए गोवातील विक्री व्यवस्थापक गंधार महाजन याना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल गौरविण्यात आले.