Connect with us

गोवा खबर

भूतानी प्रकल्पाच्या चौकशीची मागणी करण्याचे विरोधी पक्षनेते आलेमाव यांचे प्रेमानंद नाईक यांना आश्वासन

Published

on

Spread the love
गोवा खबर : भुतानी प्रकल्पाचा मुद्दा संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडून या प्रकल्पाला मिळालेल्या परवानग्या संदर्भातील सर्वंकष चौकशी करण्याचे आश्वासन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मंगळवारी सांकवाळचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांना दिले.
भूतानी प्रकल्पाविरोधात मागील ९ दिवस उपोषण करणारे प्रेमानंद नाईक यांनी युरी आलेमाव यांच्यासह दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडिस आणि गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्या संदर्भात बोलताना आलेमाव म्हणाले की, सांकवाळे परिसराला विनाशापासून वाचविण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने या प्रकल्पाला विरोध केला असून गावाच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.
ज्येष्ठ नागरिक आपल्या गावाच्या रक्षणासाठी उपोषण करत असल्याचे पाहून भाजप सरकारला खरे तर लाज वाटली पाहिजे. सर्व वस्तुस्थिती माहीत असूनही हे हृदयहीन सरकार स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून हा मुद्दा दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस पक्षाने या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला असून या बेकायदा गोष्टींच्या खोलापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. आमच्या जमिनी भांडवलदारांना विकण्याच्या तयारीत असलेल्या या भ्रष्ट आणि जमीन विक्रेत्या सरकारचा आम्ही आणखी पर्दाफाश करू, असे आलेमाव म्हणाले.
काँग्रेस नेते आलेमाव यांनी नाईक यांना हा विषय संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडून सर्वंकष चौकशीची मागणी करू, असे आश्वासन दिले.
युरी आलेमाव म्हणाले, गोव्याच्या विनाशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अशा क्रूर प्रकल्पांविरुद्धच्या लढाईत आपण सर्व जण एकवटले आहोत.
हे सरकार ज्या प्रकारे हा मुद्दा हलक्यात घेत आहे, त्यावरून सरकारमधील मंत्र्यांचे भूतानींशी हातमिळवणी असल्याचे सिद्ध होते आणि त्यांची कृती याचा पुरावा आहे असे आलेमाव पुढे म्हणाले.