गोवा खबर : भाजप सदस्य नोंदणीची नवीन यादी गुरुवारी (24 रोजी) जाहीर झाली. त्यात सत्तरी तालुक्याने बाजी मारली. एकूण 44 हजार सदस्यांची नोंद काल पूर्ण झाली. त्यामुळे वाळपई मतदारसंघ हा सदस्य नोंदणीबाबत गोव्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तिथे एकूण 23 हजार 347 सदस्यांची नोंद झाली आहे.
गेल्या आठवड्यात सत्तरी तालुक्याने सदस्य नोंदणीबाबत 40 हजारांचा टप्पा गाठला होता. पर्ये व वाळपई हे दोन्ही मतदारसंघ सत्तरी तालुक्यात येतात. पर्ये मतदारसंघात 20 हजार 582 सदस्यांची नोंद झाली आहे.
या यशाबद्दल आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि आमदार डॉ. दिव्या राणे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, साखळी मतदारसंघात 17 हजार 267 सदस्यांची नोंद झाली असून, डिचोली तालुक्यात हे प्रमाण 9 हजार 839 एवढे आहे. तिसवाडीतही भाजप सदस्य नोंदणी मोहीम गती घेऊ लागली असल्याचे दिसून येत आहे. पणजीत आत्तापर्यंत 14 हजार 56 सदस्य नोंद झाले आहेत. बार्देश तालुक्यात म्हापसा, पर्वरी, कळंगुट, शिवोली, हळदोणा व थिवी असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. तिथे भाजपची सदस्य संख्या एकूण 38 हजार 847 पर्यंत मर्यादित राहिली आहे.
म्हापसा मतदारसंघात 6,827 एवढे तर साळगावमध्ये 7,758 सदस्य नोंद झाले आहेत. कळंगुट व शिवोलीत भाजपचा अपेक्षाभंग झाला आहे. पर्वरीत 7,752 तर हळदोणे मतदारसंघात 4,494 सदस्यांची नोंद झाली आहे.