गोवा खबर : सिंगापूर येथील मरीना बे सँड्स येथे आयोजित आयटीबी आशिया २०२४ मध्ये गोवा पर्यटनाने आपल्या वैविध्यपूर्ण पर्यटन सेवांचे प्रदर्शन करून आणि आंतरराष्ट्रीय मंचावर आपली उपस्थिती प्रस्थापित करून प्रभावी सुरुवात केली आहे.
गोवा पर्यटनाच्या दालनाचे (स्टॉल क्रमांक एम५१) उद्घाटन सिंगापूर येथील भारताच्या उप उच्चायुक्त पूजा टिल्लू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रथम सचिव (वाणिज्य) टी. प्रभाकर, गोवा पर्यटन संचालक सुनील अंचिपाका, आयएएस, जीटीडीसीचे मार्केटिंग महाव्यवस्थापक गेविन डायस, पर्यटन उपसंचालक धीरज वागळे उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आणि पुढील दिवसांसाठी एक आशादायक असा स्तर निश्चित केला.
उदघाटनाच्या दिवशी गोवा पर्यटनाच्या अधिकाऱ्यांनी जागतिक प्रवासी आणि व्यापारी बांधव, मान्यवर आणि जगभरातील अभ्यागतांचे स्वागत केले आणि त्यांना गोव्याचे वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण व चैतन्य अनुभवण्यासाठी आमंत्रित केले. गोवा पर्यटनाच्या दालनाने मनमोहक प्रदर्शने, तल्लीन करणारी सादरीकरणे आणि आकर्षक कथांसह, गोव्याच्या समृद्ध अश्या सांस्कृतिक वारशाची आणि शाश्वत व पुनरुत्पादक पर्यटन पद्धतींबद्दलची वचनबद्धता, दर्शवणारी खिडकी म्हणून काम केले. येथील चर्चात्मक सादरीकरणाने अभ्यागतांना, गोव्यातील उत्साही सण, समुद्रकिनारे, साहसी पर्यटन, आयुर्वेदच्या वेलनेस सेवा आणि बरेच काही शोधण्याची संधी दिली.
सुनील अंचिपाका, गेविन डायस आणि धीरज वागळे यांनी दिवसभर प्रभावी नेटवर्किंग सत्रे आणि बीटूबी संवादांचे नेतृत्व केले, मौल्यवान अशी जागतिक भागीदारी वाढवली आणि जागतिक पर्यटन नकाशावर एक महत्त्वपूर्ण गंतव्यस्थान म्हणून गोव्याला स्थान दिले. आंतरराष्ट्रीय भागधारकांशी केलेला संवाद हा गोव्याची अफाट पर्यटन प्रदर्शन क्षमता, बैठक, इन्सेंटिव्हज, संमेलन, परिषद आणि प्रदर्शने (एमआयसीई) पर्यटन, विवाहसोहळे आणि वारसा व वेलनेस पर्यटनाला चालना देण्यावर केंद्रित होता. आपल्या प्रयत्नांनी शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल पर्यटन पद्धती सुनिश्चित करताना, जागतिक दर्जाचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या गोव्याच्या तयारीवर यावेळी भर देण्यात आला.
अंचिपाका यांनी सांगितले, आयटीबी आशिया २०२४ ही आमच्यासाठी, गोव्याची जागतिक उपस्थिती प्रस्थापित करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देणारे सहकार्य वाढविण्याचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. पुनरुत्पादक पर्यटनावर असलेला आमचा भर, नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपत्तीचे पुनरुज्जीवन करण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करतो. आमच्या सहभागाद्वारे, आमचे उद्दिष्ट केवळ गोव्यातील वैविध्यपूर्ण सेवांचेच प्रदर्शन करणे नाही तर अभ्यागतांना जबाबदार पर्यटनामध्ये गुंतण्यासाठी प्रेरित करणे हे देखील आहे, जे स्थानिक समुदायांचे कल्याण आणि आमच्या सांस्कृतिक व पर्यावरणीय वारशाचे जतन करण्यास प्राधान्य देते.आम्ही अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी उत्सुक आहोत, जे गोव्याला जागतिक प्रवाश्यांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून प्रोत्साहन देईल
या दिवसाची सांगता गोवा पर्यटनाच्या दालनाकडे सादर झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमाने उपस्थितांना गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची एक मंत्रमुग्ध करणारी झलक दिली, ज्याने राज्याच्या चैतन्यशील भावनेला मूर्त रूप देणारे पारंपारिक सादरीकरण केले. प्रत्यक्ष सादरीकरणामुळे प्रचंड उत्साह पसरला आणि या कार्यक्रमाने उपस्थित व मान्यवर दोघांनाही मोहित करत, गोव्याच्या सांस्कृतिक समृद्धीची कायमची छाप सोडली.
डायस म्हणाले, आयटीबी आशिया येथील आमचे दालन, गोव्याने देऊ केलेले बहुआयामी अनुभव, आरोग्य आणि अध्यात्मिक पर्यटनापासून ते साहस आणि एमआयसीई विभागांपर्यंत सर्व दर्शविते. आम्ही जबाबदार प्रवासाला प्रोत्साहन देत, अभ्यागतांचा अनुभव फलदायी करण्यास वचनबद्ध आहोत.
वागळे यांनी या कार्यक्रमाच्या महत्त्वावर भर देताना सांगितले, पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद, उत्स्फूर्त होता. आयटीबी आशिया गोव्याला प्रमुख भागधारकांशी जोडण्यासाठी, एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देते, फलदायी भागीदारीचा मार्ग मोकळा करते आणि आशियाई बाजारपेठेत आमची पोहोच वाढवत आहे.
आयटीबी आशियातील पहिल्या दिवसाच्या यशाने, गोव्याचे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून स्थान निश्चित केले आहे. आयटीबी आशिया सिंगापूर येथे गोवा पर्यटनाचा सहभाग आकर्षक परस्परसंवाद, मौल्यवान भागीदारी आणि तल्लीन अनुभवांचे वचन देतो. अभ्यागतांना २५ ऑक्टोबरपर्यंत मरीना बे सँड्स कन्व्हेन्शन सेंटर, बी२ येथे गोवा पर्यटन दालनाला (एम५१) ला भेट देण्यासाठी तसेच राज्याच्या अद्वितीय पर्यटन सेवा आणि नवनिर्मिती व जबाबदार पर्यटनाला प्राधान्य देणाऱ्या नाविन्यपूर्ण पद्धतींचा शोध घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.