Connect with us

गोवा खबर

गुन्ह्यांमध्ये बेरोजगार तरुणांचा सहभाग चिंताजनक : युरी आलेमाव

Published

on

Spread the love
गोवा खबर : राज्यातील घरफोडीच्या अनेक घटनांमध्ये बेरोजगार तरुणांचा सहभाग असल्याने त्यांना चांगल्या दिशेने नेण्यासाठी व अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकारने रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मंगळवारी केली. बेरोजगार तरुणांच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये झालेली वाढ ही चिंतेची बाब असून, रोजगार निर्मिती करण्यास आणि गुन्हे नियंत्रणात ठेवण्यास सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. 

युरी आलेमाव

रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्याने हजारो सुशिक्षित तरुण बेरोजगार झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्यातील बेरोजगारीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. तरीही सरकार हा प्रश्न सोडवण्याची तसदी घेत नाही, उलट नीती आयोग आणि सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे अहवाल निराधार असल्याचा आरोप करत आहे. अपयशाच्या अहवालावर राज्य सरकारचा वरच्या इंजिनवरही विश्वास नाही, असे आलेमाव म्हणाले.
आलेमाव म्हणाले, आपले बेरोजगार तरुण उपजीविकेसाठी घरफोडीचा मार्ग अवलंबत आहेत, ही धक्कादायक बाब आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांत घरफोडीच्या शंभराहून अधिक घटना घडल्या असून त्यात बेरोजगार तरुणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. हे मनाला अतिशय त्रासदायक आहे.
काही अमली पदार्थांच्या घटनांमधून सु्द्धा ही बाब स्पष्ट होते की, यात स्थानिक तरुणांचाही सहभाग आहे. ते हा अवैध धंदा का निवडतात याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे नोकरीचा पर्याय नसतो. सरकार कार्यक्रम आणि कमिशनमध्ये व्यस्त आहे, परंतु बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यात अपयशी ठरले आहे, अशी खंत आलेमाव यांनी व्यक्त केली.
बेरोजगार तरुणांच्या सहभागासह वाढत्या गुन्हेगारी कारवाया हे सिद्ध करतात की रोजगाराच्या मुद्द्याकडे लक्ष देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि युवकांना चांगल्या दिशेने नेण्यासाठी रोजगार निर्मितीसाठी गती मिळायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.