Connect with us

गोवा खबर

55व्या इफ्फीसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात

Published

on

Spread the love
  • चित्रपटांचा आनंद सामायिक करण्यासाठी माध्यम प्रतिनिधींचे इफ्फीकडून स्वागत
    एफटीआयआयद्वारे पहिल्या काही भाग्यवान माध्यम प्रतिनिधींसाठी मोफत चित्रपट प्रशंसा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

गोवा खबर : 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2024 साठी मीडिया प्रतिनिधींच्या नोंदणीला 18 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली आहे.

सुवर्णसंधी

तुम्ही अनुभवी चित्रपट समीक्षक असाल किंवा गोष्ट सांगण्याची आवड असलेले नवोदित पत्रकार असाल, 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या 55 व्या इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांची अनुभूती घेण्याची ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी म्हणून नावनोंदणी करून, दर्जेदार चित्रपटांवरील आशयघन लेखांसह हा महोत्सव जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या चमूचा तुम्ही एक भाग बनाल.

नोंदणी प्रक्रिया

माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी, 1 जानेवारी 2024 पर्यंत वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे आणि मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल किंवा ऑनलाइन माध्यम संस्थेशी संबंधित वार्ताहर, छायाचित्रकार, कॅमेरा पर्सन किंवा डिजिटल सर्जक असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा अट पूर्ण करणाऱ्या मुक्त  पत्रकारांनादेखील नोंदणी करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.  नोंदणी प्रक्रिया सुलभ असून https://my.iffigoa.org/media-login यावर ती ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते.

नोंदणीची अंतिम मुदत 12 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11:59:59 (भारतीय प्रमाणवेळेनुसार) पर्यंत आहे.  अर्जाची पडताळणी केल्यावर माध्यम प्रतिनिधी म्हणून तुमच्या स्वीकृतीबाबत नोंदणीकृत ईमेल आयडीवर कळवले जाईल याची कृपया नोंद घ्यावी.  माध्यम क्षेत्रातील ज्या व्यक्तींना सदर नोंदणी प्रक्रियेच्या माध्यमातून पत्रसूचना कार्यालयाद्वारे (पीआयबी) मान्यता देण्यात आली असेल अशाच व्यक्ती 55 व्या इफ्फी 2024 साठीचे माध्यम प्रतिनिधी म्हणून पास मिळवण्यास पात्र ठरतील. कोणत्याही माध्यम संस्थेची नियतकालिकता, आवाका (अभिसरण, प्रेक्षकवर्ग, पोहोच), चित्रपटांवरील भर  आणि इफ्फीसंदर्भातील अपेक्षित मिडिया कव्हरेज इत्यादी घटकांच्या आधारावर पीआयबी प्रत्येक माध्यम संस्थेला किती मान्यतापत्रे द्यायची याचा निर्णय घेईल.

मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधींना 18 नोव्हेंबर 2024 पासून इफ्फीच्या कार्यस्थळावर त्यांचे माध्यम प्रतिनिधी पासेस मिळतील. या संदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी कृपया ‘माध्यम मान्यतेबाबत चौकशी’ अशा विषयाच्या उल्लेखासह pibiffi[at]gmail[dot]com या ईमेल आयडीवर मेल पाठवावा.

एफटीआयआय म्हणजेच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतर्फे माध्यम प्रतिनिधींसाठी चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रम

यावर्षी एक दुर्मिळ मेजवानी पहिल्या काही नशीबवान मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधींची वाट पाहत आहे.  त्यांना  एका मोफत चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या सहयोगासह प्रतिष्ठित अशा भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील माहितगार व्यक्तींतर्फे 18 नोव्हेंबर 2024 रोजी गोव्यात पणजी येथे हा कार्यक्रम  होईल. लवकरात लवकर माध्यम प्रतिनिधी नोंदणी अर्ज सादर करणाऱ्या आणि त्या अर्जात सदर अभ्यासक्रमासाठी उपस्थित राहण्याचा पर्याय निवडणाऱ्या मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधींना पहिल्यांदा येणाऱ्यास प्रथम संधी या तत्त्वावर या एक दिवसीय अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या प्रतिनिधींना योग्य वेळी अभ्यासक्रमाचा अधिक तपशील कळवण्यात येईल.

इफ्फीविषयी थोडक्यात माहिती

वर्ष 1952 मध्ये सुरु करण्यात आलेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. इफ्फीने सुरुवातीपासूनच चित्रपट, त्यांच्या गुंगवून टाकणाऱ्या कथा आणि त्यामागील प्रतिभावान व्यक्ती यांचा गौरव करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चित्रपटांबद्दल लोकांच्या मनात तीव्र कौतुक आणि प्रेम रुजवून त्याला प्रोत्साहन देणे, लोकांमध्ये परस्परांबद्दल समजूतदारपणा आणि सौहार्दाचे सेतू तयार करणे आणि त्यांना वैयक्तिक तसेच सामुहिक उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित करणे हे या महोत्सवाच्या आयोजनाचे हेतू आहेत.

गोवा सरकारमधील गोवा मनोरंजन संस्थेच्या सहयोगासह केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे दरवर्षी इफ्फीचे आयोजन केले जाते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) बहुतांश करून या महोत्सवाचे नेतृत्व करीत असे, परंतु चित्रपट माध्यम संस्थांचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात (एनएफडीसी) विलीनीकरण झाल्यानंतर एनएफडीसीने या महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे.