Connect with us

गोवा खबर

गोंमतक मंदिर महासंघाच्या वतीने प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन सुपुर्द

Published

on

काणकोणचे उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर यांना निवेदन देताना काणकोण येथील विविध मंदिरांचे पदाधिकारी, हिंदुत्वनिष्ठ आणि गोमंतक मंदिर महासंघाचे प्रतिनिधी.
Spread the love
गोवा खबर : काणकोण येथे मंदिरांमध्ये होणार्‍या चोरीच्या प्रकरणांची जलदगतीने चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी गोमंतक मंदिर महासंघ आणि स्थानिक मंदिरांचे विश्वस्त यांनी काणकोण येथील उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर, काणकोण येथील पोलीस निरीक्षक हरिश राऊत देसाई आणि कुंकळ्ळी येथील पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर यांनी मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी पोलिसांसोबत बैठक आयोजित करणार असल्याचे म्हटले आहे. प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन देतांना माशे येथील निराकार मंदिराचे अध्यक्ष नारायण प्रभु गावकर व सचिव राजेंद्र वारीक, लोलये येथील केशव मंदिराचे अध्यक्ष विठ्ठल (प्रदीप) प्रभु माळयार, पैंगीण येथील परशुराम पंचैग्राम देवस्थानचे व नरसिंह मंदिराचे पदाधिकारी ज्ञानानंद प्रभु गावकर, पाटणे-कोळंब येथील देवगीपुरुष मंदिराचे रघुवीर कोमरपंत आणि गोमंतक मंदिर महासंघाचे प्रतिनिधी रामानंद प्रभु, प्रदीप पैंगीणकर, गोविंद लोलयेकर यांची या वेळी उपस्थिती होती.
निवेदनात म्हटले आहे की ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रारंभी लोलये, काणकोण येथील दामोदर देवस्थानच्या गर्भकुडीत प्रवेश करून अज्ञाताने ६ सहस्त्र रुपये चोरले. यावेळी चोरट्यांनी जवळच्या केशव देवस्थानमधील महादेव, केशव, ब्रह्मादेवी आणि मारुती देवतांसमोरील ६ फंडपेट्याही फोडल्या. गोव्यात वर्ष २०२२ मध्ये एकूण ६ ठिकाणी, वर्ष २०२३ मध्ये एकूण १४ ठिकाणी आणि वर्ष २०२४ मध्ये एकूण ११ ठिकाणी मंदिरांमध्ये चोर्‍या झालेल्या आहेत. मंदिरांना लक्ष्य करणारी टोळी कार्यरत झाली आहे. मंदिरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मंदिरे असुरक्षित बनू लागली आहे. मंदिरे ही हिंदूंची श्रद्धास्थाने असल्याने त्यांचे पावित्र्यासह रक्षण करणे आवश्यक आहे.