गोवा खबर:विविधतेत एकता हे आपले वैशिष्ट्य असून नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्व कलाकारांना सन्मान देण्याचे कौतुकास्पद काम अविरतपणे सुरू असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर 2024 या कालावधीत नागपूरच्या सिवील लाईन्स, आमदार निवास जवळील दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्रामार्फत “विभागस्तरीय विलुप्त लोक आणि आदिवासी कला उत्थान महोत्सवाच उद्घाटन आज गडकरींच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ शास्त्रीय नृत्य गुरू मदन पांडे, ज्येष्ठ चित्रकलाकार प्रमोदबाबू रामटेके आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम विभागाचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात देवी गोंधळ सादरीकरणाने झाली. हे सादरीकरण आनंद खडसे (कुही) व गटाने केले. यानंतर रितू बहादरे (उमरेड) व संचातर्फे लावणी नृत्य सादर करण्यात आली. महोत्सवात सुरेश घोरे (नागपूर) व संच यांचे चित्कोर नृत्य, संगीता टेकाडे (नागपूर) यांचा एकपात्री प्रयोग, रामनाथ पारधीकर (भंडारा) यांचे दंडार नृत्य व राजूजी भोयर आणि संच यांचे खडी गंमत हे लोककला प्रकार सादर करण्यात आले.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व कलाकारांचा सत्कार केला या कार्यक्रमा दरम्यान गडकरी यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले.

पहिल्या दिवशी महोत्सवात प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती. या महोत्सवात दररोज सायंकाळी 6.30 वाजेपासून नागपूर विभागातील विविध पारंपारिक, लोककला आणि आदिवासी कलांचे सादरीकरण होणार आहे. चित्र प्रदर्शन महोत्सवादरम्यान सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत प्रेषकांसाठी खुले असेल ,या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.