गोवा खबर:जागतिक पर्यटन दिनानिमित्त गोव्यातील सर्वात मोठी भागधारकांची बैठक, निसर्गरम्य अश्या नंदनवन स्पाइस फार्म येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीने पर्यटन उद्योगातील प्रमुख व्यक्तींना एकत्र आणले. माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माननीय पर्यटन मंत्री श्री. रोहन ए. खंवटे, जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, पर्यटन संचालक श्री. सुनील अंचिपाका, आयएएस, टीटीएजीचे अध्यक्ष, श्री. जॅक सुखीजा आणि स्काल इंटरनॅशनल गोवाचे अध्यक्ष श्री. विवेक केरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गोव्याच्या पर्यटन भागधारकांमधील महत्त्वाच्या सहकार्यावर या कार्यक्रमाने भर दिला. हे भागधारक राज्यातील पर्यटनाचे भविष्य घडवण्यासाठी हातात हात धरून काम करत आहेत. शाश्वतता, पर्यावरण संरक्षण आणि सामुदायिक सशक्तीकरण यांचा समतोल राखणाऱ्या पुनरुत्पादक पर्यटन पद्धती लागू करण्यावर भर दिल्याबद्दल, पर्यटन मंत्री श्री. रोहन खंवटे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे यावेळी कौतुक करण्यात आले. पर्यटन मंत्र्यांच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अंतर्गत (हिंडरलँड) पर्यटन, ग्रामीण अनुभवांना प्रोत्साहन देणे आणि गोव्याच्या पाककलेची परंपरा साजरी करणे तसेच पर्यटकांना किनारपट्टीच्या पलीकडील गोव्याच्या विविध सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन होणे, गे सुनिश्चित करणे आहे.

या कार्यक्रमात बोलताना माननीय पर्यटन मंत्री श्री. रोहन ए. खंवटे म्हणाले, की “गोव्याकडे समुद्रकिनाऱ्यांपेक्षाही आणखी खूप काही आहे. पुनरुत्पादक पर्यटनासह आमचे पर्यावरण टिकवून ठेवणारे, आमचा वारसा जतन करणारे आणि स्थानिक समुदायांचा विकास करणारे अनुभव निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. पर्यटनाचे राजदूत असलेल्या आमच्या भागधारकांसह, आम्ही असे पर्यटन प्रकल्प चालविण्यास वचनबद्ध आहोत, जे प्रत्येकाला-अभ्यागतांना आणि स्थानिकांना सारखेच लाभदायक ठरतील. नेहमीच दर्शविल्या जाणाऱ्या गोष्टींपेक्षा अधिक बरेच काही अनुभव देण्यासाठी गोवा हे योग्य गंतव्यस्थान आहे, हे दाखवून आम्ही उदयोन्मुख बाजारपेठांशी जोडले पाहिजे. गोमंतकीय या नात्याने, मला विश्वास आहे, की आम्हाला आमच्या वारशाचा खूप अभिमान आहे आणि आम्ही ते जगासमोर दाखवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही, उद्योगातील पुढारी या नात्याने, व्यवसायाच्या संधी, योग्य वातावरण आणि अर्थपूर्ण रोजगार निर्माण करणारे आहात. गोव्याचा विचार करता, आपण आपल्या कृतीद्वारे आणि जबाबदार पर्यटनाला चालना देऊन आपल्या जबाबदारीवरही भर दिला पाहिजे. पर्यटन विधेयकाचा मसुदा, जो सध्या सार्वजनिक चर्चेसाठी खुला आहे, या क्षेत्रातील अंतर दूर करतो. आम्ही या समस्या ओळखून त्यांचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे. या जागतिक पर्यटन दिनानिमित्त, नंदनवन स्पाइस फार्म येथे झालेला हा मेळावा म्हणजे उदाहरण आहे. विशेषत: इको-टूरिझमला चालना देण्यासाठी उद्योगातील हे सहकार्य पाहून मला आनंद झाला आहे. आम्ही गोव्याच्या पर्यटनासाठी एकत्रितपणे शाश्वत भविष्य घडवू शकतो.”
पर्यटन संचालक श्री. सुनील अंचिपाका, आयएएस, यांनी विभागाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकताना सांगितले, की “आमचे प्राथमिक लक्ष हे जबाबदार पर्यटनाला चालना देण्यावर आहे, जे केवळ पर्यावरणाचे रक्षण आणि पोषण करत नाही तर आपल्या स्थानिक समुदायांना देखील बळकट आणि उन्नत करते. पुनरुत्पादक पर्यटन पद्धतींद्वारे, आम्ही प्रवाश्यांना खऱ्या अर्थाने अस्सल गोव्याचा अनुभव देण्यासाठी समर्पित आहोत. असा अनुभव जो दररोजच्या अनुभवांच्या पलीकडे जातो आणि पर्यटकांना आमच्या समृद्ध अश्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाशी जोडतो. याचबरोबर आम्ही भविष्यातील पिढ्यांसाठी या अमूल्य संपत्तीचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहोत. यासोबत गोवा शाश्वत, समुदाय-चालित आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक आहे, याची खात्री करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
शैक्षणिक उत्कृष्टतेचा गौरव म्हणून, २०२४-२५ वर्षाची प्रतिष्ठित श्री. व्हिन्सेंट रामोस शिष्यवृत्ती, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम), गोवाचे ग्लेन लोबो आणि क्रिस्टल डी सोझा यांना प्रदान करण्यात आली. ही शिष्यवृत्ती स्वर्गीय श्री. व्हिन्सेंट रामोस, गोव्याचे एक प्रतिष्ठित सुपुत्र जे आयएचसीएल गोवाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ताज एक्झोटिका रिसॉर्ट आणि स्पा चे महाव्यवस्थापक होते, त्यांच्या सन्मानार्थ सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या कारकिर्दीत ते उम्मेद भवन पॅलेसचे महाव्यवस्थापक होते, ज्याला जगातील सर्वोत्तम लक्झरी हॉटेल म्हणून सन्मानित करण्यात आले होते. आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रातील भावी नेत्यांना पाठिंबा देण्याप्रती, राज्याच्या समर्पणाला बळकटी देण्यास ही शिष्यवृत्ती म्हणजे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री श्री. रोहन खंवटे यांच्या सोबत केक कापून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सर्व उपस्थितांसाठी चैतन्यमय आणि उत्सवी वातावरण निर्माण करण्यासाठी, उत्साही असा संगीतमय बँड परफॉर्मन्स सादर झाला.
या कार्यक्रमाला वैयक्तिक आणि सर्जनशील स्पर्श यावा यासाठी, मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री आणि पर्यटन संचालक यांचा समावेश असलेला रंगीत हात-मुद्रण उपक्रम आयोजित करण्यात आला. या प्रतिकात्मक उपक्रमाने पर्यटन विभाग आणि त्याच्या भागधारकांमधील एकता अधोरेखित केली, जी गोव्याच्या पर्यटन उद्योगाला उन्नत करण्यासाठी एकत्र काम करण्याची त्यांची सामायिक बांधिलकी दर्शवते.
या कार्यक्रमाचा समारोप गोव्याच्या पर्यटनासाठी आशावादी दृष्टीकोन ठेऊन झाला. कार्यक्रमात राज्याचा शाश्वत विकास आणि पर्यटन क्षेत्राला पुढे नेणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात आला