Connect with us

गोवा खबर

फोंडा येथील आयटीआयमध्ये पीएम-विश्वकर्मा कार्यक्रमाचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातल्या वर्धा येथे राष्ट्रीय विश्वकर्मा योजनेच्या यशस्वी वर्षपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम झाला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजना आणि प्रकल्पांचा प्रारंभ करण्यात आला. 

पीएम-विश्वकर्मा योजनेच्या  देशभरातील काही निवडक  18 पारंपरिक हस्तकौशल्य कारागीर लाभार्थ्यांना प्रत्येकी  एक लाख रूपये कर्जाचा धनादेश पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण देशभरातील 50 ठिकाणांवर करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील  स्थानिक विविध  हस्त कौशल्य कारागीर सहभागी झाले होते. केंद्रीय लघू-सुक्ष्म-मध्यम उद्योग मंत्रालय आणि केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

फोंडा येथील आयटीआय फार्मागुडी येथे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री रवी नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नाईक यांच्या हस्ते पीएम- विश्वकर्मा योजनेच्या नव्या   लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रम परिसरात पारंपरिक स्थानिक पीएम-विश्वकर्मांनी तयार केलेल्या विविध हस्त कौशल्य वस्तूंचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.

या कार्यक्रमाला लघू-सुक्ष्म-मध्यम उद्योग विभाग, केंद्रीय कौशल्य विकास विभाग,  आणि राज्याच्या कौशल्य विकास संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात राज्यातील उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यातील 351 पारंपरिक स्थानिक हस्त कौशल्य कारागीर आणि महिला मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या.