Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांहस्ते लॉजिस्टिक विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पर्वरीतील मंत्रालयात उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय लॉजिस्टीक विषयावरील कार्यसत्राचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात गोव्यासाठी पीएम गतिशक्ती राज्य मास्टर प्लॅनच्या अंमलबजावणी आणि वापरासाठी मानक कार्यप्रणाली दस्तऐवजाचा शुभारंभ करण्यात आला.

ही कार्यशाळा पीएम गतिशक्ती, युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म आणि गोवा लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग धोरण 2023 ची अंमलबजावणी या विषयावर केंद्रित होती.

मुख्यमंत्री सावंत यांनी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी लॉजिस्टिक क्षेत्राचा विकास करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. गोवा लॉजिस्टिक आणि वेअरहाउसिंग धोरण आणि सर्व खात्यांच्या सहयोगी प्रयत्नांद्वारे, लॉजिस्टिक क्षमता वाढवण्याचे आमचे ध्येय आहे, असे ते म्हणाले.

पीएम गतिशक्ती राज्य मास्टर प्लॅनद्वारे डिजिटल पोर्टल आणि सॉफ्टवेअरसह रस्ते आणि बंदरे आणि सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर यासारख्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या पीएम गतिशक्ती पोर्टल्समध्ये शाळा, रुग्णालये, उद्योग आणि रस्ते यासारख्या गंभीर पायाभूत सुविधांचा डेटा मॅप केला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्मचा वापर करून सरकार वाहतूक व्यवस्थापन पद्धत लागू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

एनएलडीएसएलचे सीईओ गिरीश कुमार सुरपूर यांनी युनिफायड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्मची आणि डीपीआयआयटीचे उपसचिव रवी किरण यांनी पीएम गतिशक्ती उपक्रमाची माहिती दिली.

19 आणि 20 सप्टेंबर या दोन दिवसांच्या कार्यशाळेचा उद्देश राज्य मास्टर प्लॅनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध खात्यांतील नोडल अधिकार्‍यांना आवश्यक माहिती देणे असा आहे. अहमदाबाद येथील बीआयएसएजी-एनची टीम पीएम गतिशक्ती पोर्टलवर प्रशिक्षण देईल.

या कार्यक्रमाला उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालक डॉ. एग्ना क्लीटस, आयएएस, उद्योग, व्यापार आणि वाणिज्य सचिव स्वेतिका सचान, आयएएस, गोवा पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई आणि विविध खात्यांतील वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. नियोजन अधिकारी डॉ. गीता जोशी यांनी सूत्रसंचालन केले.