Connect with us

गोवा खबर

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांनी गोव्याचा समृद्ध वारसा आणि वेलनेस टुरिझमच्या क्षमतेचा केला अभ्यास

Published

on

Spread the love
गोवा खबर : गोवा पर्यटन विभाग ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
या अभ्यास दौऱ्यात जीटीडीसीचे महाव्यवस्थापक गेविन डायस, जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक (विपणन/हॉटेल्स) दीपक नार्वेकर, सहाय्यक पर्यटन अधिकारी श्रीमती चित्रा वेंगुर्लेकर आणि जीटीडीसीचे व्यवस्थापक विपणन प्रसाद कवळेकर, प्राध्यापक डॉ.योगेश शिंदे इतर प्राध्यापक व शासकीय अधिकारी उपस्थित होते. या सहलीने गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आरोग्य पर्यटनाचा अविस्मरणीय़ अनुभव दिला.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यास दौऱ्याची सुरुवात ऐतिहासिक आग्वाद जेल म्युझियमला भेट देऊन केली. या ऐतिहासिक स्थळाने विद्यार्थ्यांना गोव्याच्या भूतकाळात खोलवर डोकावण्याची संधी दिली, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका दाखविण्य़ात आली आणि “गोवा बियॉन्ड बीचेस” उपक्रमांतर्गत एक प्रमुख गंतव्यस्थान म्हणून त्याची उत्क्रांती देखील उलगडण्यात आली.
नंदनवन स्पाइस प्लांटेशनमध्ये एआयआयएच्या विद्यार्थ्यांचे पारंपारिक पद्धतीने फुलांच्या पाकळ्य़ांनी व कोकम सरबताने स्वागत करण्यात आले. त्यांना अस्सल गोवन खाद्यपदार्थही देण्यात आले. विद्यार्थ्यांना गोव्यातील मसाल्यांच्या विविध श्रेणींबाबत प्राध्यापक डॉ. योगेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या भेटीने या मसाल्यांचे औषधी गुणधर्म आणि आयुर्वेदिक पद्धतींमध्ये त्यांची अविभाज्य भूमिका याविषयी मौल्यवान माहिती मिळाली. ज्यामुळे गोव्याच्या प्रसिद्ध समुद्रकिना-यांच्या पलीकडे असलेल्या अनोख्या सेवेबद्दल विद्यार्थ्यांची समज अधिक समृद्ध झाली.
जीटीडीसीचे महाव्यवस्थापक गेविन डायस म्हणाले, हा उपक्रम गोव्याला त्याच्या वैविध्यपूर्ण वेलनेस टुरिझमसह सर्वांगीण गंतव्यस्थान म्हणून दाखवण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. एआयआयएच्या विद्यार्थ्यांची भेट गोव्याचे आयुर्वेदिक आणि वेलनेस पर्यटनाचे केंद्र म्हणून स्थान बळकट करते. जी आमच्या पर्यटन विभागाच्या ‘गोवा बियॉन्ड बीचेस’ मोहिमेचा एक आवश्यक पैलू आहे.
नंदनवन स्पाइस प्लांटेशन दौऱ्यानंतर, विद्यार्थ्यांच्या अभ्यासगटाने गोव्यातील एक प्रमुख आध्यात्मिक स्थळ असलेल्या मंगेशी मंदिराला भेट दिली. विद्यार्थ्यांनी एकादश तीर्थ मंदिरांपैकी एक असलेल्या मंदिराचे दर्शन घेतले. सोबत गोव्याच्या विविध पर्यटन सेवा त्यांची समजून घेतल्या तसेच आध्यात्मिक पर्यटनाचे सार देखील जाणून घेतले.
जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक (विपणन/हॉटेल्स) दीपक नार्वेकर म्हणाले, एआयआयएच्या तरुण मनांना निसर्ग जाणून घेताना पाहून आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्या भेटीमुळे वेलनेस टुरिझमचे वाढते महत्त्व अधोरेखित होते, जे आमच्या चालू उपक्रमांचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांना निसर्गाशी जुळवून घेण्याची आणि नंदनवन स्पाइस प्लांटेशनच्या विविध मसाल्यांचा शोध घेण्याची संधी मिळाली.
एआयआयएचे प्राध्यापक डॉ. योगेश शिंदे यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक केले. ते म्हणाले, या अभ्यास दौऱ्याने आमच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक तत्त्वांचा वास्तविक जगतात होणाऱ्या उपयोगांची माहिती दिली आहे. गोव्याच्या नैसर्गिक संसाधनांसह पारंपारिक आयुर्वेदिक पद्धतींचे एकीकरण हे वेलनेस टुरिझमचे एक प्रारुप दर्शवते. जे समकालीन आरोग्य उपक्रमांसह प्राचीन ज्ञानाला प्रभावीपणे जोडते. या अनुभवाने आमच्या विद्यार्थ्याचे ज्ञान वाढण्यास मदत झाली आहे. त्यांच्या भविष्यातील अभ्यासासाठी एक मौल्यवान संदर्भ म्हणून काम करेल. मंगेशी मंदिराला भेट दिल्यानंतर आणि आग्वाद जेल म्युझियममध्ये गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे तसेच गोव्याच्या आध्यात्मिक बाजूचे ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थी खूप उत्सुक होते.
या शैक्षणिक सहलीने गोव्याच्या विपुल पर्यटन क्षमतेचे, विशेषत: वेलनेस आणि आध्यात्मिक पर्यटनाच्या क्षेत्रात, सुंदर समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडील गोवा ही ओळख दॄढ केली आहे.