गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सेंट फ्रांसिस झेवियर अवशेष दर्शन सचिवालय समितीची पहिली बैठक पर्वरीतील मंत्रालयात संपन्न झाली. जुने गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर प्रदर्शन २०२४ च्या नियोजन आणि व्यवस्थेवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. हे प्रदर्शन २१ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ पर्यंत ४५ दिवस चालेल.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात्रेकरूंसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आणि कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सरकारच्या कटिबद्धतेवर भर दिला. जुने गोवा, कुंभारजुवा भागातील सध्याच्या पायाभूत सुविधा, नवीन पायाभूत सुविधांची आवश्यकता, वाहतूक आणि इतर व्यवस्थांचा त्यांनी आढावा घेतला.
यात्रेकरूंसाठी गोव्याच्या आर्कडायोसीसच्या सहकार्याने एक समर्पित पोर्टल सुरू केले जाईल. हे पोर्टल यात्रेकरूंना विशेषत: आजारी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी निवासाची व्यवस्था बुक मदत करील. चर्चच्या परिसरात भक्तांसाठी केंद्रे स्थापन केली जातील आणि सांता मोनिका चर्चमध्ये गोव्यातील ६५ कलाकारांचे कला प्रदर्शन भरविले जाईल.

या बैठकीत रस्ते सुविधा, स्वच्छतागृहे, सुशोभीकरण, रोषणाई अशा आवश्यक गरजांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील आणि कव्हरवे, वॉशरूम, पिण्याचे पाणी बूथ आणि पार्किंग व्यवस्था उभारली जाईल. वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना नेण्यात मदत करण्यासाठी इलेक्ट्रिक बग्गी प्रदान केल्या जातील.
या बैठकीला पंचायत मंत्री तथा दर्शन सचिवालय समितीचे अध्यक्ष माविन गुदिन्हो, पर्यावरण मंत्री आणि दर्शन सोहळा समितीचे उपाध्यक्ष आलेक्स सिक्वेरा, सचिव (महसूल) संदिप जॅकीस, आयएएस आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रदान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर आणि दर्शन सचिवालय समितीचे समन्वयक फादर हेन्री फाल्काओ, एसएफएक्स पिलारचे फादर लॉरेन्स फर्नांडिस आणि विविध खात्यांतील वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.