खाणी आणि खनिज क्षेत्रातील आव्हाने आणि संधी या विषयावर एमजीएमआयतर्फे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राला केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी संबोधित केले
गोवा खबर:केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी.किशन रेड्डी यांनी आज एमजीएमआय अर्थात भारतीय खनिकर्म, भूगर्भीय, धातुशास्त्र संस्थेने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या खाणी आणि खनिज क्षेत्रातील आव्हाने आणि संधी या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले.
केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी यावेळी खाणकाम आणि संशोधनासंबंधी उद्योगांमध्ये कार्यरत खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांमधील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी ठोस चर्चा देखील केली.उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींनी त्यांच्यासमोरील आव्हानांची माहिती देऊन या चर्चेदरम्यान काही बहुमूल्य सूचना तसेच शिफारसी देखील मांडल्या.
यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या सर्व समस्या तसेच प्रस्तावित धोरणात्मक सूचनांचा सखोल आढावा घेऊन तसेच त्यावर चर्चा करून केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्रालय त्वरित कार्यवाही करेल अशी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिली.अशा प्रकारचा परस्पर संवाद उत्तम प्रशासनासाठी आवश्यक आहे यावर अधिक भर देत केंद्रीय मंत्री म्हणाले की, यातून उद्योग क्षेत्राचे गतिशील स्वरूप तसेच सरकारच्या प्रयत्नांशी या क्षेत्राच्या दृढ समन्वयाचे दर्शन घडते.
उद्योग क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींच्या मेळाव्याला संबोधित करताना, जी.किशन रेड्डी म्हणाले की, विकसित भारत-2047 च्या दिशेने सुरु असलेल्या देशाच्या वाटचालीत तसेच आमूलाग्र आत्मनिर्भरता साध्य करण्यात भारताच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असेल. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कोळसा आणि खनिज क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडवून आणले असून त्यामुळे हे क्षेत्र अधिक पारदर्शी तसेच स्पर्धात्मक बनले आहे.कोळसा आणि खनिज खाणींसाठी व्यावसायिक लिलाव प्रक्रियेची सुरुवात तसेच या क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या भागीदारीला प्रोत्साहन देणे इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या दशकभरात केंद्र सरकारने या क्षेत्रातील क्षमतेचा वापर करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले आहेत असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, महत्त्वाची खनिजे आता आधुनिक अर्थव्यवस्थेच्या प्रेरकांच्या रुपात उदयाला आली आहेत आणि राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिजे अभियानाच्या माध्यमातून देशासाठी या जागतिक संधीचा वापर करून घेण्याची सुनिश्चिती भारत सरकारने केली आहे. खासगी क्षेत्राच्या भागीदारीचे महत्त्व देखील अधोरेखित करत केंद्रीय मंत्र्यांनी या उलगडत जाणाऱ्या विकासगाथेचा भाग होण्याचे आवाहन उद्योगक्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना केले.ते म्हणाले की सरकारने खासगी क्षेत्रातील उद्योगांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच संबंधित जोखमीच्या घटकांचे उपशमन करण्यासाठी व्यवसाय करण्यातील सुलभता वाढवण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी या प्रसंगी, कोळशाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने उचललेली पावले तसेच देशांतर्गत कोळसा उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजना यासंदर्भात तपशीलवार चर्चा केली.

खनिजांच्या विषयावर चर्चा करताना, केंद्रीय मंत्र्यांनी खनिज संशोधनाच्या भांडवल-केंद्रित स्वरुपाची दखल घेत यासंदर्भात आपल्या क्षमता वाढवण्यासाठी अधिक सखोल संशोधन,वैज्ञानिक अन्वेषण तसेच सहयोगी संबंधांची गरज अधोरेखित केली.
भाषणाचा समारोप करताना, केंद्रीय मंत्र्यांनी उद्योग प्रतिनिधींना खनन क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या बाबतीत सरकारशी सहयोग करण्याचे आवाहन केले.
औद्योगिक वृद्धी आणि शाश्वत विकास या दोन्हींप्रती सरकारची कटिबद्धता दृढ करत या चर्चासत्राने सखोल चर्चा तसेच भारतातील खनिकर्म आणि खनिजे क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या संकल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठीचा मंच उपलब्ध करून दिला.