Connect with us

गोवा खबर

पेडणेत १३ रोजी तवडकर यांचे व्याख्यान

Published

on

Spread the love
गोवा खबर : पेडणे येथे संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय कला व वाणिज्य महाविद्यालयात नवचेतना युवक संघ पेडणे व संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालय पेडणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा विधानसभेचे सभापती तथा काणकोण मतदारसंघाचे आमदार रमेश तवडकर यांचे ‘श्रमधाम’ या विषयावर व्याख्यान दिनांक १३ जुलै रोजी सकाळी १० वा. आयोजित करण्यात आल्याची माहिती कृष्णा पालयेकर यांनी पेडणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांच्यासोबत समाजसेवक तथा चांदेल हसापूर पंचायतीचे सरपंच तुळशीदास गावस उपस्थित होते.कृष्णा पालेकर यांनी माहिती देताना सांगितले की, सभापती रमेश तवडकर यांची ‘श्रमधाम’ ही संकल्पना फक्त काणकोण मतदारसंघापूर्ती मर्यादित राहिली नसून ती संपूर्ण भारतभर पसरलेली आहे आणि लोकांनी या संकल्पनेला स्वीकारले आहे. या संकल्पनेची माहिती पेडणे तालुक्यातील विद्यार्थ्यांना व्हावी व आपणही समाजाचे देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून कार्य कसे करता येते याचा अनुभव प्रत्यक्ष सभापती रमेश तवडकर यांच्याकडून आमच्या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तथा व्याख्याते म्हणून गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा हस्तकला व लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर , विर्नोडा पंचायतीच्या सरपंच अक्षदा सावंत, समाजसेवक तथा चांदेल हसापूर पंचायतीचे सरपंच तुळशीदास गावस, धारगळचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच भूषण नाईक हे उपस्थित राहणार आहेत.

तुळशीदास गावस यांनी सांगितले की, सभापती रमेश तवडकर यांची श्रमधाम ही संकल्पना खरोखरच प्रेरणादायी आहे. राजकारण करत असताना त्याचा समाजाला कसा फायदा करून देता येतो हे या संकल्पनेतून आपल्याला कळते. शेवटच्या घटकाला आपला हात देऊन कुठलाही माणूस निवाऱ्याशिवाय राहू नये तसेच हताश, दुर्बल, असाह्य असू नये या दृष्टिकोनातून माणुसकीने भरलेली ही संकल्पना आहे. या व्याख्यानाला पेडणे तालुक्यातील विद्यार्थी, समाजसेवक तसेच इतर लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन तुळशीदास गावस यांनी केले आहे.