Connect with us

गोवा खबर

गोवा-आयडीसीद्वारे आयडीसी-कनेक्ट २०२४ अंतर्गत वेर्णा येथे ओएनडीसीबाबत कार्यशाळेचे आयोजन

Published

on

Spread the love



गोवा खबर:गोवा औद्योगिक विकास महामंडळ (गोवा-आयडीसी)च्या वतीने वेर्णा औद्योगिक वसाहत येथे आयोजित आयडीसी-कनेक्ट२०२४ उपक्रमाअंतर्गत ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) या विषयावरील कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यशाळेस गोवा राज्याच्या उद्योग खात्याच्या सचिव स्वेतिका सचान (आयएएस), गोवा-आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक; गोवा वाणिज्य आणि उद्योग चेंबर (जीसीसीआय)चे मानद सचिव यतीन काकोडकर, वेर्णा औद्योगिक वसाहत उद्योग संघटनेचे अध्यक्ष प्रदिप डा कोस्टा, वीज खात्याचे मुख्य विद्युत अभियंता स्टीफन फर्नांडिस आणि गोव्यातील विविध उद्योग प्रतिनिधींची उपस्थिती या कार्यशाळेत राहिली.

भारत सरकारच्या विस्तार प्रकल्प असलेल्या ओएनडीसीच्या उपाध्यक्ष असलेल्या आदिती सिंघा यांनी कार्यशाळेतील उपस्थितांना भारतामध्ये ई-कॉमर्स प्रणालीचे लोकशाहीकरण करण्यासाठी ओएनडीसी या प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या सुविधा, या प्लॅटफॉर्मची क्षमता या बाबी ठळकपणे मांडल्या. ई-कॉमर्स पद्धतीचे लोकशाहीकरण करत छोट्या व्यापारी, विक्रेते, उत्पादक, तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म, किरकोळ विक्रेते यांना अविरतपणे जोडून ठेवण्याबाबत उपलब्ध केलेल्या सेवांच्या माध्यमातून ओएनडीसीचे महत्व त्या विषद केले.


गोवा राज्याच्या उद्योग खात्याच्या सचिव स्वेतिका सचान (आयएएस) यांनी गोव्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या”आयडीसी कनेक्ट २०२४ आणि ओएनडीसी कार्यशाळा या माध्यमातून गोव्यातील औद्योगिक समुदायाला पाठबळ देण्याबाबत राज्य शासनाची कटिबद्धता प्रतिबिंबित होते. ओएनडीसीसारख्या नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्मचा अवलंब करून, आपण राज्यातील उद्योगांना, विशेषत: सूक्ष्म-लघु-मध्ये व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना शाश्वत विकास साधण्यासाठी सक्षम करत आहोत.”


गोवा-आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक यांनी गोव्यातील डिजिटल कॉमर्सच्या भविष्यासाठी आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले, “आयडीसी कनेक्ट २०२४ सारखे उपक्रम, ओएनडीसी सारख्या कार्यशाळा यावर विशेष भर देताना राज्यातील उद्योगांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी असे उपक्रम प्रेरक म्हणून काम करतात. या उपक्रमांतून विविध घटकांना जोडतात, त्यांना व्यवसाय वाढीच्या संधी प्रदान करतात आणि व्यावयासिक भरभराटीसाठी पूरक वातावरण सादर करत व्यावसायिक यशाची नवी उंची गाठण्यास मदत करतात. ओएनडीसी सारख्या प्लॅटफॉर्मचा अवलंब करत, गोव्यातील उद्योग-व्यवसाय आपल्या व्यावसायिक क्षितिजाचा विस्तार करण्यासाठी, नवीन बाजारपेठांशी जोडण्यासाठी आणि या क्षेत्रातील सुप्त क्षमता समोर आणत या क्षेत्राच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न आहे.”


या कार्यशाळेमध्ये सूक्ष्म-मध्यम-लघु उद्योग क्षेत्रातील भागधारकांना आपले विचार, कल्पना यांची देवाणघेवाण करण्याची आणि अधिक समावेशक आणि समृद्ध भविष्यासाठी नवा मार्ग चोखाळण्याची अनोखी संधी सादर केली. तंत्रज्ञान आणि नावीन्यतेच्या सामर्थ्यावर ओएनडीसीने सूक्ष्म-लघु-मध्यम व्यवसायांच्या गरजा, अपेक्षा यांना या आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी ठेवत डिजिटल कॉमर्सचे नियम नव्याने परिभाषित केले जात आहेत. राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला पाठिंबा देण्यासाठी असे आणखी उपक्रम आयोजित करण्यास गोवा-आयडीसी उत्सुक आहे.