Connect with us

गोवा खबर

इंडिया आघाडीला दोन्ही जागा जिंकण्याचा विश्वास

Published

on

Spread the love
गोवा खबर: गोव्यातील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दोन्ही जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे आणि राज्याच्या संरक्षणासाठी यापुढेही काम करणार असे म्हटले आहे. 
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी युतीच्या भागीदारांसह बुधवारी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले आणि युती कायम राहणार असल्याचे सांगितले.
दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियाटो फर्नांडिस, आपचे अध्यक्ष अमित पालयेकर, राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष जुझे फिलिप, गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत आदी उपस्थित होते.
गोव्यातील जनतेने मोठा पाठिंबा दिल्याबद्दल पाटकर यांनी आभार मानले.
“लोकांनी भाजपविरोधात राग व्यक्त केला आहे आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली आहे. दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत हे आता आम्ही आत्मविश्वासाने सांगू शकतो,” असे पाटकर म्हणाले.
ते म्हणाले की गोव्याची ओळख, वारसा आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र काम करेल.
अमित पालयेकर म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या नेत्यांना इंडिया आघाडीची इतकी भीती होती की, दक्षिण गोवा मतदारसंघातल्या ज्या ठिकाणांना त्यांनी कधीही भेट दिली नव्हती, तिथेही ते पोहचले.
“मला आनंद आहे की लोक अजूनही लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवतात आणि म्हणूनच त्यांनी मोठ्या संख्येने मतदान केले. गोव्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी गोव्यातील लोकांचा आभारी आहे,” असे पालयेकर म्हणाले.
जुझे फिलिप म्हणाले की, लोकांनी भाजपविरोधात राग काढण्यासाठी मतदान केले. “त्यांनी त्यांच्या विरोधात मतदान करण्यामागे कारण होते. गोव्याला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत लोक गंभीर आहेत. त्यामुळे ही निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीसारखी दिसत होती, जिथे प्रचंड मतदान झाले ,” असे ते म्हणाले.
दुर्गादास कामत म्हणाले की, खाणपट्ट्यात मतदारांची संख्या वाढली आहे, यावरून खाण अवलंबितांनी भाजपच्या विरोधात मतदान केल्याचे दिसून येते. “मला विश्वास आहे की आमचे उमेदवार विजयी होतील,” असे ते म्हणाले.
कॅप्टन विरिएटो फर्नांडिस म्हणाले की, प्रचारादरम्यान जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल आपण सदैव आभारी राहीन. ते म्हणाले, “मी इंडिया आघाडी, कार्यकर्ते आणि इतरांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभारी आहे.”