Connect with us

गोवा खबर

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट गोव्यात करमुक्त करा !

Published

on

Spread the love

हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी

गोवा खबर: नुकताच बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रणदीप हुडा यांनी दिग्दर्शित केलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट गोव्यासह देशभर प्रदर्शित झाला आहे. थोर क्रांतीकारी स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या उत्युंग अशा कार्यावर हा चित्रपट प्रकाश टाकणारा आहे. हा चित्रपट विद्यार्थीवर्गापासून प्रौढापर्यंत सर्वांनीच पहावा, असाच आहे. हा चित्रपट गोवा राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, आज शालेय पाठ्यपुस्तकांमधून दुर्दैवाने आपल्या क्रांतीकारकांविषयी जुजबी, तर कधी चुकीची माहिती दिली जाते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना क्रांतीकारकांविषयी सविस्तर आणि खरी माहिती मिळाल्यास त्यांना त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण होऊन विद्यार्थ्यांमधील देशप्रेम वृद्धींगत होण्यास अधिक साहाय्य होईल. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामध्ये त्यांची जीवनकथा उलगडली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात स्वा. सावरकर यांनी अंदमानमधील काळ्या पाण्याची शिक्षेची भयावहता अधिक सखोलपणे मांडण्यात आली आहे.

इतक्या नरकयातना होत असूनही त्यांनी जिद्द सोडली नाही, हे आजकाल छोट्या छोट्या कारणांमुळे आत्महत्या करणार्‍या युवा पिढीसाठी आदर्श उदाहरण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रप्रेम, हिंदुत्व, राजकारण, समाजकारण, साहित्यलेखन, समाजातील दीनदुबळांच्या उद्धारासाठीचे कार्य, अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केलेले अथक प्रयत्न, ‘अभिनव भारत’ संघटनेचे उत्युंग असे कार्य,  यांवर हा चित्रपट प्रकाश टाकतो. एक व्यक्ती किती विविध क्षेत्रात कार्यरत असू शकते, हेदेखील युवापिढीला मार्गदर्शक ठरेल. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट पाहिल्यास त्यांच्याविषयी पसरवला जात असलेला अपसमज सहजपणे दूर होऊ शकतो. पुढची पिढी राष्ट्रप्रेमी घडायला हवी, यासाठी अधिकाधिक युवकांनी हा चित्रपट पहायला हवा. म्हणून  ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट गोव्यात लवकरात लवकर करमुक्त करावा.