गोवा खबर: आल्तिन येथील वनभवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री श्री विश्वजीत रोणे यांच्या उपस्थितीत पॉवरग्रीड पश्चिम विभाग-१च्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत आरोग्य सेवा खात्याला ६ प्राथमिक उपचार सुविधा असलेल्या आणि २ कार्डियाक उपचार सुविधा असलेल्या रूग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या.

यावेळी आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालिका डॉ गीता काकोडकर, पॉवर ग्रीडचे अधिकारी-वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री एसबीआर राव, उपमहाव्यवस्थापक श्री बी एल कुमारे, मुख्य व्यवस्थापक श्री नासिर हुसेन शेख आणि प्रभू भंडारे व इतर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना आरोग्य मंत्री श्री विश्वजीत राणे यांनी रुग्णवाहिका गोव्यातील आरोग्य सेवेसाठी एक संपत्ती आहे आणि या रूग्णवाहिकांमुळे जीव वाचविण्यासाठी मदत होते असे सांगितले. गोवा आरोग्य मॉडेलचे कौतुक करताना त्यांनी सरकार सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करण्यावर भर देत आहे आणि जुन्या रुग्णवाहिका बदलून रुग्णवाहिकांचा सध्याचा ताफा बळकट करणार असल्याचे सांगितले.
प्राथमिक उपचार सुविधा असलेल्या रुग्णवाहिका या सामान्यत: आपत्कालीन रुग्णवाहिका असतात आणि गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णालयात पोहोचेपर्यंत आवश्यक वैद्यकीय सहाय्य देतात. या रुग्णवाहिका नंतर चिखली येथील उपजिल्हा रुग्णालय, पेडणे आणि काणकोण येथील सामाजिक आरोग्य केंद्र, शिवोली, केपे आणि खोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुपूर्द केल्या जातील. कार्डियाक ॲम्ब्युलन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रूग्णवाहिका ह्रदयग्रस्त रुग्णांना मदत करण्यासाठी १०८ कडे सुपूर्द केल्या जाईल.