गोवा खबर:गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाचे २०१९-२०२०, २०२०-२०२१ आणि २०२१-२०२२ वर्षांचे भाषा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण गोव्याचे मुख्यमंत्री तसेच राजभाषा मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ५ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता पाटो, पणजी, गोवा येथील बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे.
राजभाषा संचालनालयातर्फे भाषांच्या विकासासाठी भाषा पुरस्कार योजना राबविण्यात येते. संस्कृत, कोंकणी आणि मराठी भाषांसाठी समर्पितपणे कार्य केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. याद्वारे अशा थोर व्यक्तींचा आदर्श जनतेसमोर ठेवावा तसेच साहित्यिकांना मानसन्मान देऊन त्यांनी भाषेच्या वृद्धीसाठी केलेल्या कार्याची दखल घेणे हा सरकारचा या योजनेमागचा उद्देश आहे.
यंदा २०१९-२० या वर्षाचा ‘ज्ञानपीठकार रविंद्र केळेकर कोंकणी भाषा पुरस्कार’ प्रख्यात साहित्यिक श्री. पुंडलीक नारायण नाईक यांना, ‘बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार’ प्रसिद्ध इतिहासकार आणि साहित्यिक श्री. उल्हास कुष्ट प्रभू देसाई यांना तर ‘दुर्गाराम उपाध्ये संस्कृत भाषा पुरस्कार’ संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक श्री. लक्ष्मण कृष्णा पित्रे यांना जाहीर झाला आहे.

वर्ष २०२०-२१ सालचा ‘ज्ञानपीठकार रविंद्र केळेकर कोंकणी भाषा पुरस्कार’ बाल साहित्यासाठी परिचित असलेल्या श्रीमती मीना सुरेश काकोडकर यांना, ‘बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार’ प्रसिद्ध समिक्षक आणि संशोधक डॉ. सोमनाथ दत्ता कोमरपंत यांना तर ‘दुर्गाराम उपाध्ये संस्कृत भाषा पुरस्कार’ संस्कृतचे प्रज्ञावान अभ्यासक श्री. मनोहर दत्ताराम आमशेकर यांना जाहीर झाला आहे.
वर्ष २०२१-२२ सालचा ‘ज्ञानपीठकार रविंद्र केळेकर कोंकणी भाषा पुरस्कार’ कोंकणी लेखक श्री. अशोक पांडुरंग भोसले यांना, ‘बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार’ मराठी पत्रकार आणि लेखक श्री. गुरूदास सिताराम सावळ यांना जाहीर झाला आहे. या वर्षाच्या संस्कृत पुरस्कारासाठी एकही नामांकन प्राप्त झाले नसल्याने हा पुरस्कार देण्यात आलेला नाही.
एक लाख रूपये, शाल, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सरकारने नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय तज्ञांच्या निवड समितीने प्राप्त झालेल्या अनेक नामांकनांमधून कोंकणी, मराठी आणि संस्कृत भाषेचे संवर्धन आणि विकासासाठी भरीव योगदान दिलेल्या वरील व्यक्तींची निवड या पुरस्कारांसाठी केली आहे. पुरस्कार विजेत्यांच्या आप्तेष्ठांनी तसेच भाषा प्रेमींनी या कार्यक्रमाला आवर्जून रहावे असे आवाहन राजभाषा संचालनालयाने केले आहे.
यावेळी राजभाषा सचिव श्री. सरप्रीत सिंग गील, आय.ए.एस., राजभाषा संचालक श्री. राजू गावस, राजभाषा उप-संचालक श्री. अनिल सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला जोडूनच राजभाषा संचालयातर्फे दोन पुस्तकांचें प्रकाशन केले जाणार आहे. यामध्ये कु. संपदा कुंकळ्येकार यांनी लिहिलेल्या गीतार्थ- भगवद्गितेचो आपरोस आणि डॉ. हनुमंत चोपडेकार यांनी लिहिलेल्या “कोंकणी चळवळीचीं तीन पानां” या कोंकणी पुस्तकांचा समावेश आहे.